बागा-हडफडे येथील जप्त केलेले पेट्रोल आणि दुकानदारासमवेत नागरी पुरवठा खात्याच्या सहाय्यक संचालक दीपा फुलारी व सहकारी पथक.
म्हापसा : बागा-हडफडे येथील एका दुकानावर छापा टाकून नागरी पुरवठा खात्याच्या बार्देश तालुका विभागाने बेकायदेशीररीत्या पेट्रोलचा साठा आणि विक्री करणाऱ्या प्रकाराचा पदार्फाश केला. या कारवाईत विभागाने दुकानातील ३८ लिटर पेट्रोल जप्त केले आहे.
ही कारवाई विश्वसनीय माहितीच्या आधारे गुरुवारी सायंकाळी करण्यात आली. बागा-हडफडे येथील रॉयल एनफिल्ड शोरूम जवळील एका दुकानावर बेकायदेशीररीत्या पेट्रोल इंधनचा साठा ठेवण्यात आल्याची माहिती नागरी पुरवठा खात्याला मिळाली होती. त्यानुसार खात्याच्या सहाय्यक संचालक दीपा फुलारी यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक राजीव सावंत, उपनिरीक्षक रोहित तळणकर, सर्वेश नाईक तुयेकर आणि सदाशिव खांडेपारकर यांच्या अंमलबजावणी पथकाने सदर दुकानावर छापा टाकला.
तपासणीदरम्यान या पथकाला २३ लिटर पेट्रोल असलेला एक मोठा प्लास्टिकचा डबा आणि पेट्रोल भरलेल्या प्रत्येकी १ लिटर क्षमतेच्या १५ प्लास्टिकच्या बाटल्या सापडल्या. हे सर्व ३८ लिटर पेट्रोल जप्त करण्यात आले. या बेकायदा कृत्याबद्दल संबंधित दुकानदार मोहम्मद अब्दूलाह आलम (रा. मूळ बिहार) यांच्याविरूद्ध बार्देश नागरी पुरवठा खात्याने हणजूण पोलिसांत तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवण्याची विनंती केली आहे.
शीतपेयावर ‘कूलिंग चार्ज’ची अवैध वसुली
बागा-हडफडे येथील एका दुकानदाराने शीतपेयाच्या बाटलीवर ‘कूलिंग चार्ज’च्या नावाखाली अतिरिक्त १५ रुपये आकारल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. नागरी पुरवठा खात्याच्या पथकाने छापा टाकलेल्या या दुकानात हा प्रकार आढळून आला होता. या अवैध वसुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ग्राहक हक्कांसाठी कार्यरत ‘गोवा कॅन’ संस्थेने संबंधित दुकानदाराविरुद्ध वजन व मापे खात्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.


