पणजी : राज्यातील कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी खात्याने नवीन तीन योजना अधिसूचित केल्या आहेत. यामध्ये उच्च उत्पादन देणारे बियाणे खरेदीसाठी ५० टक्के अनुदान, नवीन भात बियाण्यांचा वापर करणाऱ्यांना मोफत बियाणे व अन्य सहाय्य देणे, खाजन शेती करणाऱ्यांना शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानित दरात बियाणे पुरवणे आदींचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय या योजनेमध्ये शेतकऱ्यांना अन्य स्वरुपात आर्थिक मदत देण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे.
उच्च उत्पादन देणारे बियाणे योजनेचा लाभ भात, शेंगदाणे, डाळी व मसाल्याच्या पदार्थांची लागवड करणाऱ्या शेतकरी, शेतकरी संघटनांना घेता येणार आहे. यासाठी फोंडा, म्हापसा, पेडणे आणि हळदोणे येथील सरकारमान्य एजन्सीसह काही केंद्रीय संस्था अथवा अन्य कोणत्याही दुकानांतून बियाणे खरेदी करता येतील. शेतकऱ्यांना कमाल २ हेक्टर शेतीसाठी १२० किलो बियाण्यांसाठी अनुदान देण्यात येईल. दुसऱ्या योजनेद्वारे एसआरआय प्रणालीला चालना देण्यात येणार आहे. नवीन बियाण्यांचा वापर करू इच्छित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
या योजने अंतर्गत नवीन बियाणे पूर्णपणे मोफत देण्यात येतील. यामध्ये डाळी, वरी, नाचणी आदी पिकांचा समावेश आहे. भात शेतीमध्ये एसआरआय प्रणाली वापरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २० हजार रुपये मदत दिली जाईल. याशिवाय कामगार आणि इतर खर्च म्हणून १००० चौमीसाठी बियाण्यानुसार ५,५०० ते ७,००० रुपये देण्यात येणार आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी क्षेत्रीय कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज करावे लागणार आहेत. तर, तिसऱ्या योजनेनुसार खाजन शेतीसाठी लागणारी बियाणी पूर्णपणे मोफत पुरवली जाणार आहेत. यासाठी बियाण्यांची कमाल मर्यादा १०० किलो आहे.


