पावसाच्या पुनरागमनामुळे भातशेतीला धोका नाही, मात्र उत्पन्नात घट शक्य!

कृषी संचालकांची माहिती : भात रोपांची लागवड जवळपास पूर्ण

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
2 hours ago
पावसाच्या पुनरागमनामुळे भातशेतीला धोका नाही, मात्र उत्पन्नात घट शक्य!

पणजी : सध्या झालेल्या पावसामुळे भाताची पिके सध्या तरी धोक्याबाहेर आहेत. मात्र, यंदा कमी झालेल्या पावसामुळे भात उत्पादनात घट होण्याची शक्यता अद्याप कायम असल्याची माहिती कृषी संचालक चंद्रहास देसाई यांनी दिली.

पावसाने बराच काळ दडी मारल्यामुळे भातशेतीसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. शेतातील पाणी आटल्याने आणि वाढत्या तापमानामुळे रोपे तसेच पेरलेले बियाणे धोक्यात आले होते. या पार्श्वभूमीवर कृषी खात्याने सर्वेक्षण केले. काही ठिकाणी खाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढल्याने शेतांचे नुकसान झाले असले, तरी इतर भागांत कोणतेही मोठे नुकसान झाल्याचे आढळले नाही. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे भातशेतीची परिस्थिती सुधारली असून उशिराने झालेल्या पेरणीमुळेही पिकांचे विशेष नुकसान झालेले नाही, असे देसाई यांनी सांगितले.

राज्यात भात रोपांची लागवड जवळपास पूर्ण झाली असून सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. केवळ १० टक्के लागवड शिल्लक आहे. सध्याच्या पावसामुळे भाताची रोपे धोक्याबाहेर असून शेतांमध्ये आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध आहे. पुढील काही दिवसांसाठी हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जारी केला असला, तरी त्याचा शेतीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता नसल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले.

सध्या पिकांचे कोणतेही नुकसान झालेले नसून पिकांची वाढ सामान्य आहे. मात्र, कमी पावसामुळे भाताच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता अद्याप कायम आहे. दुसरीकडे, कमी पाऊस हा भाजीपाला लागवडीसाठी मात्र फायदेशीर ठरत आहे. विशेषतः डोंगराळ भागातील भाजीपाला पिकांना या हवामानाचा लाभ झाला आहे. मात्र, याच परिस्थितीचा फटका भातशेतीला बसला आहे, असे कृषी संचालक चंद्रहास देसाई यांनी सांगितले.  

हेही वाचा
सर्व पहा