पेडे-म्हापसा येथील रस्त्यावर अवैध पार्किंगमुळे वाहतूक कोंडी

वाहतूक पोलीस, जिल्हा इस्पितळाने पार्किंगवर तोडगा काढण्याची मागणी

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
30th July, 11:59 pm
पेडे-म्हापसा येथील रस्त्यावर अवैध पार्किंगमुळे वाहतूक कोंडी

पेडे-म्हापसा : म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळाच्या आवारात वाहनतळासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने इस्पितळासमोरील ‘नो पार्किंग’ क्षेत्रात खुलेआम वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे पेडे ते कोर्ट जंक्शनदरम्यानच्या रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून हा परिसर सध्या कायमस्वरूपी वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू ठरत आहे.

उत्तर गोव्यासह शेजारील सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी म्हापसा जिल्हा इस्पितळात येतात. या रुग्णांना घेऊन येणाऱ्या चारचाकी, दुचाकी तसेच खासगी रुग्णवाहिकांमुळे इस्पितळाच्या आवारातील वाहनतळ लवकरच भरून जातो. परिणामी, वाहनचालकांना नाईलाजाने मुख्य रस्त्याच्या कडेला वाहने उभी करावी लागतात.

पेडे जंक्शनवरून म्हापसा शहरात ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यात जिल्हा इस्पितळामुळे वाहनांची वर्दळ अधिक वाढते. याशिवाय पेडणे व डिचोली तालुक्यातील प्रवासी बस तसेच बसस्थानक ते जिल्हा इस्पितळदरम्यान धावणाऱ्या कदंब महामंडळाच्या बसही याच मार्गाचा वापर करतात.

रस्त्याच्या कडेला उभी करण्यात येणारी वाहने अर्धा रस्ता व्यापत असल्याने बस, रुग्णवाहिका आणि इतर चारचाकी वाहनांना मार्ग काढणे कठीण होते. परिणामी संपूर्ण रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होते. ही कोंडी दूर होण्यासाठी बराच वेळ लागत असल्याने उपचारासाठी धावणाऱ्या रुग्णवाहिकाही त्यात अडकून पडतात, ज्याचा फटका रुग्णसेवेलाही बसत आहे.

स्थानिकांच्या मागणीनुसार वाहतूक पोलिसांच्या सूचनेवरून या ठिकाणी ‘नो पार्किंग’चा फलकही उभारण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन करून त्याच ठिकाणी वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे विशेषतः सकाळच्या वेळेत वाहतूक कोंडी तीव्र होत असून वाहनचालक, प्रवासी आणि रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

म्हापसा वाहतूक पोलीस, उत्तर गोवा जिल्हा इस्पितळ प्रशासन आणि नगरपालिका यांनी समन्वय साधून या बेकायदा वाहन पार्किंगच्या समस्येवर तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यासह उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची वाहनतळाची समस्याही मोठ्या प्रमाणात सुटेल, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

हेही वाचा
सर्व पहा