'फ्री उमर खालिद' घोषणा दिली का?; गोवा पोलिसांचे २४० प्रश्न

‘आंदोलनाला निधी कुणी दिला?' अशा प्रश्नांचाही समावेश

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
30 mins ago
'फ्री उमर खालिद' घोषणा दिली का?; गोवा पोलिसांचे २४० प्रश्न

पणजी : म्हापसा येथे २४ जुलै रोजी झालेल्या नीट (NEET) पेपरफुटीविरोधातील आंदोलनानंतर गोवा पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना तब्बल २४० प्रश्नांची प्रश्नावली भरून घेण्याचा प्रकार समोर आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रश्नावलीत "'फ्री उमर खालिद'ची घोषणा दिली का?", "सरकार किंवा सरकारी अधिकाऱ्यांवर टीका केली का?", "आंदोलनासाठी निधी कुणी पुरवला?" अशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. (Did you shout ‘Free Umar Khalid’ slogan?: Goa Police’s 240-point quiz sheet).

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील जंतरमंतरवरील नीट पेपरफुटी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी म्हापसा येथे निदर्शने आयोजित करण्यात आली होती. या आंदोलनानंतर 'सिटिझन्स ऑफ म्हापसा' या स्थानिक गटाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गोवा पोलिसांनी किमान दोन आंदोलनकर्त्यांना चौकशीसाठी बोलावले. चौकशीदरम्यान त्यांच्याकडून विस्तृत प्रश्नावली भरून घेण्यात आली.

या प्रश्नावलीत आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले, आंदोलनाचा उद्देश काय होता, आंदोलनासाठी बॅनर, फलक, ध्वनीप्रणाली यांची व्यवस्था कोणी केली, किती फलक वाटण्यात आले, आंदोलनाशी संबंधित व्हॉट्सअॅप, टेलिग्राम गटांशी संबंध आहे का, तसेच यापूर्वी अशा आंदोलनांत सहभाग घेतला होता का, यासह अनेक प्रश्नांचा समावेश होता.

विशेष म्हणजे, माजी जेएनयू विद्यार्थी व कार्यकर्ते उमर खालिद यांच्याशी संबंधित प्रश्नही विचारण्यात आले. त्यामध्ये आंदोलनापूर्वी उमर खालिद यांच्याविषयी माहिती होती का, "'फ्री उमर खालिद'ची घोषणा दिली का? दिली असल्यास किती वेळा?", "इतरांनी ती घोषणा पुन्हा दिली का?" अशा प्रश्नांचा समावेश होता. याशिवाय आंदोलनाशी संबंधित इलेक्ट्रॉनिक माहिती हटवली का, तसेच मोबाईल तपासणीसाठी देण्यास तयार आहात का, असेही विचारण्यात आले.

उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांनी माहिती देताना सांगितले की,  'सिटिझन्स ऑफ म्हापसा’ या गटाकडून तक्रार प्राप्त झाली होती.  त्यानुसार आंदोलनकर्त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. समाधानकारक माहिती मिळेपर्यंत आवश्यक ते प्रश्न विचारणे हा चौकशी प्रक्रियेचा भाग असतो.'

‘त्यांच्यावर’ पोलीस योग्य कारवाई करणार : मुख्यमंत्री 

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनात 'फ्री उमर खालिद' अशा आशयाचे फलक का दाखविण्यात आले, असा प्रश्न उपस्थित केला होता. राष्ट्रहित आणि सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात पोलीस योग्य ती कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. 

हेही वाचा
सर्व पहा