मुख्यवाडा, कोरगाव येथे खारट पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त

आठवडाभरात तोडगा न निघाल्यास महिलांचा आंदोलनाचा इशारा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
26 mins ago
मुख्यवाडा, कोरगाव  येथे खारट पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त

पेडणे : पेडणे तालुक्यातील कोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील मुख्यवाडा परिसरातील सुमारे १५ घरांना गेल्या काही दिवसांपासून खारट व दूषित पाणीपुरवठा (Salty water supply at Corgao. Pernem)  होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या दूषित पाण्यामुळे विविध आजारांचा धोका निर्माण झाल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील जलवाहिनीला गळती लागल्यामुळे मानशीतील खारट पाणी जलवाहिनीत घुसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून जलवाहिनीची तपासणी तसेच पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत,  अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

याशिवाय, जलपुरवठा मीटरचे मासिक रीडिंग नियमितपणे घेतले जात नसल्याने चार महिन्यांनी एकाच वेळी मीटर रीडिंग घेऊन नागरिकांना वाढीव पाणी बिलांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याची तक्रारही रहिवाशांनी केली आहे.

महिलांचा सा. बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा 

दरम्यान, येत्या आठवडाभरात खारट पाणीपुरवठ्याची समस्या दूर न झाल्यास मुख्य वाड्यातील महिला पेडणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे.