पणजी : बुधवारी राज्यात पावसाने ५० इंचाचा टप्पा पार केला. राज्यात १ जून ते २९ जुलै दरम्यान सरासरी ५०.३९ इंच पावसाची नोंद झाली आहे. यादरम्यान सांगेमध्ये सर्वाधिक ६७ इंच पाऊस पडला आहे. यंदा पावसाचे प्रमाण ३२.७ टक्क्यांनी कमी आहे, यामुळे ५० इंचाचा टप्पा पार करण्यासाठी काहीसा वेळ लागला आहे. मागील वर्षी ११ जुलै रोजी, २०२५ मध्ये ८ जुलै तर २०२४ मध्ये ७ जुलै रोजी पावसाचे अर्धशतक पूर्ण झाले होते. पावसामुळे धरणातील पाणीसाठा सातत्याने वाढतो आहे. २९ जुलै रोजी साळावली धरण ९८.५ टक्के भरले होते.
बुधवारी राज्यात किरकोळ पावसाची नोंद झाली असून पुढील तीन दिवस राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. बुधवारी पणजीत कमाल ३१.२ अंश तर किमान २६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगावमधील कमाल तापमान ३०.९ अंश तर किमान तापमान २६.४ अंश सेल्सिअस राहिले. ४ ऑगस्टपर्यंत राज्यातील कमाल तापमान ३० ते ३२ अंश तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने राज्यातील अन्य धरणे देखील वेगाने भरत आहेत. २९ जुलै रोजी गवाणे धरण ९८ टक्के भरले होते. तिळारी धरणात ८३.७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. आमठाणे धरणात ७९.६ टक्के, चापोलीमध्ये ६३.१ टक्के, पंचवाडीत ८७.४ टक्के तर अंजुणे धरणात ५५.८ टक्के पाणीसाठा होता. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील एक ते दोन दिवसांत साळावली आणि गवाणे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.


