पेडणे : कारवारहून महाराष्ट्राच्या दिशेने होणारी अवैध दारूची वाहतूक अबकारी खात्याने (Excise Department) धडक कारवाई करत उधळून लावली आहे. न्हयबाग-पोरस्कडे येथील सातार्डा पुलावरील अबकारी चेकपोस्टवर काल रात्रीदरम्यान तब्बल २०० पेट्या अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाहनाच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोवा-महाराष्ट्र सीमाभागात अबकारी खात्याकडून नियमित गस्त व वाहनांची तपासणी सुरू होती. दरम्यान, कारवारच्या दिशेने येणारे एक संशयित वाहन सातार्डा पुलाजवळील चेकपोस्टवर पोहोचले असता, अबकारी अधिकाऱ्यांनी ते थांबवून पाहणी केली. वाहनाची कसून तपासणी केली असता, त्यामध्ये चोरट्या मार्गाने महाराष्ट्रात नेला जाणारा २०० पेट्यांचा दारूचा मोठा साठा आढळून आला.
अबकारी खात्याच्या पथकाने तात्काळ कारवाई करत सर्व मद्यसाठ्यासह वाहतुकीसाठी वापरलेले वाहन जप्त केले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या चालकाची सध्या कसून चौकशी सुरू असून, हा मद्यसाठा नेमका कोठून आणला होता आणि महाराष्ट्रात तो कोणाला पाठवला जाणार होता, याचा शोध घेतला जात आहे. सीमेवर तपासणी कडक केल्याने अवैध दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.


