पणजी : कर्मचारी निवड आयोगाने कोकणी आणि मराठी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची ३९० पदे भरण्यासाठी जाहिरात दिली असली, तरी सर्वसाधारण आणि ओबीसी मिळून एकूण ३१४ उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. कमी असलेल्या ७६ पदांसाठी पुन्हा जाहिरात जारी केली जाईल. कर्मचारी भरती आयोगाकडून ही माहिती मिळाली.
प्राथमिक शिक्षकांसाठी पुन्हा जाहिरात जारी होणार आहे. तेव्हा नवीन पदे आणि ही ७६ पदे मिळून जाहिरात जारी केली जाईल. कर्मचारी भरती आयोगाने प्राथमिक शाळांमध्ये कोकणी आणि मराठी शिक्षक पदांसाठी अर्ज मागवणारी जाहिरात ३० जानेवारी २०२६ रोजी जारी केली होती. मराठी शिक्षकांसाठी ३५२ तर कोकणी शाळांच्या शिक्षकांसाठी ३८ पदे भरण्यासाठी अर्ज मागवले होते.
गोव्यात बी.एड. तसेच डी.एड. धारक उमेदवारांची संख्या मोठी आहे. यामुळे मराठी आणि कोकणी शिक्षकांसाठी हजारो इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले. पहिली आणि दुसरी सीबीटी (संगणक आधारित परीक्षा) झाल्यानंतर पात्र उमेदवारांसाठी क्लास डेमोस्ट्रेशन (प्रात्यक्षिक वर्ग) चाचणी झाली. यानंतर आयोगाने निवडीसाठी गुणवत्ता तसेच प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे.
मराठी शिक्षकांसाठी ३५२ पदांपैकी सर्वसाधारण गटात १५८, एसटीसाठी ४२, एससीसाठी ४, ओबीसीसाठी ११३ तर ईडब्ल्यूएससाठी ३५ पदे जाहीर झाली होती. यापैकी सर्वसाधारण गटात १३६, एसटी ४२, एससी ४, ओबीसी ९२, ईडब्ल्यूएस १०, दिव्यांग १ तर गुणवंत खेळाडूंच्या गटात २ उमेदवारांचा समावेश गुणवत्ता यादीत आहे. एसटी आणि एससीसाठी सर्वच्या सर्व म्हणजेच यादीनुसार ४२ आणि ४ उमेदवारांची निवड झाली आहे. सर्वसाधारण गटात २२ तर ओबीसी गटात २१ उमेदवार कमी आहेत. ईडब्ल्यूएससाठी ३५ जागा असताना १० उमेदवारांची नावे गुणवत्ता यादीत आहेत. मराठीसाठी जाहिरातीपेक्षा ६५ उमेदवार कमी आहेत.
कोकणी प्राथमिक शाळांमध्ये ३८ पदांसाठी जाहिरात दिली होती. सर्वसाधारण गटात १९, ओबीसी १५ आणि ईडब्ल्यूएस गटासाठी ४ जागा होत्या. यापैकी सर्वसाधारण गटात ११, ओबीसींमध्ये १५ तर ईडब्ल्यूएस गटात एका उमेदवाराची निवड झाली आहे. रिक्त असलेल्या ११ पदांसाठी पुन्हा जाहिरात जारी केली जाईल.


