पणजी : येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी एसटी आरक्षणाची कार्यवाही व्हावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. एसटी आरक्षणाची त्वरित कार्यवाही व्हावी, अशी गोवा सरकारचीही इच्छा असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
गोवा एसटी आरक्षण विधेयक संसदेत संमत होऊन त्याचे कायद्यात रूपांतर झाले असले, तरी अद्याप त्याच्या कार्यवाहीची अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली एसटी नेत्यांच्या शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन याविषयीची कार्यवाही लवकरात लवकर करण्याची मागणी केली आहे. या भेटीला महिना उलटून गेला असला, तरी अद्याप कार्यवाहीबाबत कोणतीही हालचाल झालेली नाही.
यामुळे एसटी समाजबांधवांमध्ये याविषयी शंका निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मडगावात एसटी नेत्यांची बैठक पार पडली असून, आरक्षणाची त्वरित कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे आगामी काळात हा विषय चांगलाच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


