नवी दिल्ली : नवीन सुरू झालेल्या 'बी.टेक सायबर सुरक्षा' या अभ्यासक्रमासाठी प्रवेश नाकारल्याच्या रागातून एका विद्यार्थ्याने देशपातळीवरील नामांकित 'आयआयटी कानपूर' आणि 'आयआयटी मद्रास' या संस्थांच्या अधिकृत संकेतस्थळांवर बेकायदेशीर शिरकाव केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वेबसाईट हॅक केल्यानंतर, "साईट हॅक केली आहे, मला फक्त एक योग्य संधी हवी आहे," असा संदेश त्या विद्यार्थ्याने डिजिटल पोर्टलवर सोडला होता.

संबंधित विद्यार्थ्याने बी.टेक सायबर सुरक्षा अभ्यासक्रमासाठी रीतसर अर्ज प्रक्रिया पूर्ण केली होती, शुल्क भरले होते आणि स्वतःच्या संशोधनाचे पुरावेही सादर केले होते. मात्र, प्रवेश प्रक्रियेतील प्राथमिक छाणनीत आणि 'हॅकाथॉन'मध्ये तो आपली पात्रता सिद्ध करू शकला नाही, ज्यामुळे त्याला डावलण्यात आले. यानंतर आपली सायबर सुरक्षेतील क्षमता थेट दाखवण्यासाठी त्याने दोन्ही आयआयटीच्या डिजिटल प्रणालीत प्रवेश मिळवला. या घटनेचे स्क्रीनशॉट्स त्याने 'ट्विटर' आणि 'रेडिट' या सोशल मीडिया मंचांवर शेअर केले. संस्थेच्या सिस्टीमचे नुकसान करणे हा आपला हेतू नसून केवळ स्वतःची कौशल्ये सिद्ध करणे हाच उद्देश असल्याचे त्याने सोशल मीडियावर स्पष्ट केले होते.
या घटनेची गंभीर दखल घेत आयआयटी कानपूरचे संचालक प्रा. मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितले की, तात्काळ एफआयआर दाखल करून तरुणाचे भवितव्य धोक्यात घालण्याऐवजी त्याच्या तांत्रिक क्षमतेची सत्यता पडताळणे गरजेचे आहे. चालू शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने त्याला सध्या थेट प्रवेश देणे नियमानुसार शक्य नाही. मात्र, विद्यार्थ्याला संस्थेत बोलावून वरिष्ठ प्राध्यापक आणि अभियंत्यांद्वारे त्याच्या तांत्रिक कौशल्याची चाचणी घेतली जाईल. तो पात्र ठरल्यास त्याला सायबर सुरक्षा तंत्रज्ञान केंद्रात इंटर्नशिप दिली जाऊ शकते, तसेच पुढील वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुभा असेल.
या घटनेमुळे सायबर सुरक्षेतील प्रतिभेची दखल घेणे आणि कायदेशीर चौकटीचे पालन करणे याविषयी नवी चर्चा सुरू झाली आहे. अनधिकृतपणे डिजिटल प्रणालीत शिरकाव करणे हा गंभीर गुन्हा असून ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी कायदेशीर मार्गांचाच अवलंब केला पाहिजे, असा स्पष्ट इशाराही आयआयटी प्रशासनाने दिला आहे.


