पुणे : शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या नामांकित संस्थेमध्ये चक्क पैसे घेऊन बनावट पदवी प्रमाणपत्रे देणारे रॅकेट कार्यरत असल्याचा गंभीर आरोप झाल्याने संपूर्ण शैक्षणिक विश्वात खळबळ उडाली आहे.
महेश कदम हे रिक्षाचालक आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासंदर्भातील माहिती घेण्यासाठी विद्यापीठात गेले होते. तेथे वित्त व लेखा विभागातील सहाय्यक कक्ष अधिकारी रमेश मुखेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कदम यांच्या मुलाला ३ लाख रुपयांच्या बदल्यात बी.कॉम. (B.Com) ची पदवी देण्याचे आमिष दाखवले. कदम यांनी ही रक्कम दिल्यानंतर त्यांना मिळालेल्या पदवी प्रमाणपत्रावर 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' ऐवजी जुने 'युनिव्हर्सिटी ऑफ पुणे' असे नाव छापलेले आढळले. याशिवाय चार वर्षांच्या अभ्यासासाठी चार वेगवेगळी पदवी प्रमाणपत्रे देण्यात आली होती. हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच कदम यांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने कुलगुरू कार्यालयाकडे लेखी तक्रार नोंदवली.
विद्यापीठाच्या लेखा विभागातील जबाबदार कर्मचाऱ्यानेच असा गैरप्रकार केल्याचा आरोप झाल्याने विद्यापीठ प्रशासनाच्या प्रशासकीय नैतिकतेवर आणि सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी एका उच्चस्तरीय सत्यशोधन समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त होताच दोषींवर कडक प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


