पुढील ३० वर्षांचा विचार करून राज्यातील जनतेसाठी जलनियोजन!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : १५० एमएलडी कच्चे पाणी वहन योजनेचे लोकार्पण

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
28th July, 11:28 pm
पुढील ३० वर्षांचा विचार करून राज्यातील जनतेसाठी जलनियोजन!

डिचोली : प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, शुद्ध आणि नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पाण्याच्या बाबतीत गोवा पूर्णपणे स्वयंपूर्ण करण्यासाठी गेल्या सात वर्षांपासून नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू आहे. भविष्यातील वाढती लोकसंख्या, शहरीकरण, पर्यटन, औद्योगिक विस्तार आणि शेतीच्या गरजा लक्षात घेऊन पुढील तीस वर्षांचा विचार करून राज्याची जलनीती तयार करण्यात आली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

१५० कोटी खर्चाच्या आमठाणे-कुचेली १५० एमएलडी कच्चे पाणी वहन योजनेच्या लोकार्पणप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. या प्रकल्पामुळे उत्तर गोव्यातील नागरिकांना पुढील २५ ते ३० वर्षे अखंड पाणीपुरवठा होणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, आमठाणे-कुचेली कच्चे पाणी वहन योजना ही केवळ अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना नसून गोव्याच्या भावी पिढ्यांच्या जलसुरक्षेची भक्कम हमी आहे. तिलारी प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागत होते. कालव्याला तडा गेला किंवा अन्य तांत्रिक अडचण निर्माण झाली तर उत्तर गोव्यातील अनेक भागांना दहा ते पंधरा दिवस पाणीपुरवठा खंडित होत असे. ही समस्या कायमची दूर करण्यासाठी पर्यायी जलव्यवस्था उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. आमठाणे धरणातून कच्चे पाणी उचलून विविध जलशुद्धीकरण केंद्रांपर्यंत पोहोचविण्याची ही योजना त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.

मंत्री सुभाष शिरोडकर यांनी आमठाणे उत्तम प्रकल्प असल्याचे सांगितले. मंत्री रोहन खंवटे, नीळकंठ हळर्णकर यांनी आपापल्या मतदारसंघात आमठाणेचे पाणी पोहचणार असल्याने पाण्याची कमतरता दूर होणार असल्याचे सांगितले. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी हा प्रकल्प खऱ्या अर्थाने जल नियोजनाचा उत्तम प्रकल्प असल्याचे सांगितले.

यावेळी अभियंते तसेच कंत्राटदार यांचा मुख्यमंत्र्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

अामठाणे ते कुचेली दरम्यान १२०० मिमी आणि १००० मिमी व्यासाची डक्टाईल आयर्न पाइपलाईन टाकण्यात आली आहे. या योजनेद्वारे अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला १०० एमएलडी, पिळर्ण ३० एमएलडी, पर्वरीला १५ एमएलडी आणि आसगावला ५ एमएलडी असा एकूण १५० एमएलडी कच्च्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे मंत्री शिरोडकर म्हणाले. समृद्धी गणपुले यांनी सूत्रसंचालन केले.

साळ पंपिंग प्रकल्प ४ महिन्यांत पूर्ण होणार

साळ येथील पंपिंग प्रकल्प येत्या चार महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर साळसह परिसरातील भागांना अधिक मुबलक आणि सुरळीत पाणीपुरवठा होईल. पाण्याच्या बाबतीत गोवा स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा
सर्व पहा