पर्वरी : येथील ओ कोकेरो ते सांगोल्डा दरम्यानच्या चोगम रस्त्यावरील वीज खांबांवर उभारलेले जाहिरात फलक स्थानिक पादचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरलेले आहेत. हे जाहिरात फलक फुटपाथवरून ये- जा करणाऱ्या लोकांना दुखापतीचे कारण बनले असून हे फलक संबंधितांनी त्वरित हटवावेत, अशी मागणी पादचाऱ्यांनी केली आहे.
चोगम रस्त्याच्या कडेला पादचाऱ्यांच्या सोयीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने फुटपाथ बांधलेली आहेत. तसेच पथदीपचे डिझाईन हे पर्यटनाच्या दृष्टीकोणातून केलेले आहे. या पथदीपांच्या वीज खांबावर खासगी एजन्सींनी जाहिरात फलक बसवलेले आहेत. या वीज खांबांची उंची मुळातच कमी आहे. त्यावर हे होर्डींग फलक उभे केल्याने ते फुटपाथपासून दीड- दोन मीटरवर आहेत.
या फुटपाथचा वापर पर्वरी तसेच सांगोल्डा आणि पिळर्ण भागातील नागरिक मॉर्निंग वॉकसाठी करतात. शिवाय या रस्त्याच्या पट्ट्यात मोठी दुकाने असून नागरिकांची खरेदीसाठी या दुकानांमध्ये रेलचेल असते. मात्र, फुटपाथवरून चालताना हे जाहिरात फलक या पादचाऱ्यांच्या डोक्याला आदळतात आणि दुखापत होते. तसेच फलकांना लागून छत्र्यांची देखील मोडतोड होत आहे.
संबंधित खासगी जाहिरात एजन्सीने लोकांना आकर्षित की धोका निर्माण करण्यासाठी हे फलक उभे केलेले आहेत, असा सवाल पादचारी लोक उपस्थित करत आहेत. वीज खाते तसेच साबांखाच्या रस्ता विभागाने याकडे लक्ष देऊन हे फलक तत्काळ हटविण्याचे निर्देश संबंधित जाहिरात एजन्सीला द्यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


