एसआयटीच्या नियुक्तीनंतरही जमिनी हडपण्याचे प्रकार सुरूच

पोंबुर्फा, सांगोल्डातील प्रकरणातून प्रकार उघड


14 mins ago
एसआयटीच्या नियुक्तीनंतरही जमिनी हडपण्याचे प्रकार सुरूच

गोवन वार्ता प्रतिनिधी
म्हापसा : सरकारने जमीन हडप प्रकरणी विशेष चौकशी पथकाची नियुक्ती करूनही राज्यातील जमिनी बळकावून त्या बड्या रिअल इस्टेट कंपन्यांकडून परप्रांतीय श्रीमंतांना विकण्याचे प्रकार सुरूच आहेत. हल्लीच म्हापसा व पर्वरी पोलिसांत नोंद झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये तर आई, वडील आणि मुलगा अशा दोन नातेवाईक कुटुंबांचा समावेश आहे.
पोंबुर्फा येथील स्व. फ्रान्सिस्को दो रूझारियो फर्नांडिस यांच्या मालकीची सर्व्हे क्रमांक १९/१ मधील १८५० चौ. मी. जमिनीची बनावट कागदपत्रे करून संशयितांनी ती स्वत:च्या नावावर करून घेतली. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी शांताराम दत्ताराम देसाई, दत्ताराम कृष्णराव देसाई, काशीबाई दत्ताराम देसाई (सर्व रा. आंबेडे, सत्तरी), गणपत सोनू परब, ज्योती गणपत परब (रा. दत्तवाडी, म्हापसा व मूळ पिळगाव), चेतन डेव्हलपर्स अँड प्रमोटर्स आणि इतर अज्ञात व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आल्तो पर्वरी येथील अॅड. गजेंद्रनाथ उसगावकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला आहे. फसवणुकीचा प्रकार १२ जुलै २०२१ पूर्वी म्हापसा येथे घडला. जमीनमालक फ्रान्सिस्को दो रूझारियो फर्नांडिस यांचे २ नोव्हेंबर १९७० रोजी हरारे (झिम्बाब्वे) येथे निधन झाले. संशयितांनी आपापसातील सामायिक उद्देशाने बनावटगिरीचा गुन्हेगारी कट रचला व पोंबुर्फा येथील स्व. फ्रान्सिस्को दो रूझारियो फर्नांडिस यांचे खोटे नाव धारण करून वरील जमिनीची फसवणुकीच्या हेतूने बनावट कागदपत्रे तयार केली. जमिनीचे हक्क स्वत:च्या नावे हस्तांतरित करून घेतले. जमिनीच्या कायदेशीर वारसांना हक्कांपासून वंचित ठेवले. नंतर संशयितांनी जमीन परस्पर रिअल इस्टेट कंपनीला विकली.
सांगोल्डा येथील जमिनीचा विक्री सामंजस्य करार करूनही जमीन परस्पर भलत्यालाच विकण्यात आली. याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी जमिनीचे मूळ मालक फ्रान्सिस आय. फर्नांडिस (६२) व रोमाना रोझी फ्रान्सिस फर्नांडिस (रा. बांद्रा मुंबई) यांच्यासह ब्रोकर नुरू फैझल भाटकर (बेती), विनित शेट (नास्नोळा) व करण गणपत परब (रा. पिळगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीचा प्रकार १७ फेब्रुवारी २०२३ ते २४ मार्च २०२५ या कालावधीत पेन्हा दी फ्रान्स, पर्वरी येथे घडला. याप्रकरणी धरमपाल कुकरेजा (७३) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सांगोल्डा (बार्देश) येथील सर्वे क्रमांक ९९/२१ मधील जागा संशयित जमीनमालक फ्रान्सिस फर्नांडिस व रोमाना फर्नांडिस यांच्याकडून फिर्यादींनी खरेदी केली. यासाठी २ कोटी रुपये आगाऊ देत जमीन विक्रीचा सामंजस्य करार केला. जमीन खरेदीची पूर्ण रक्कम फिर्यादींनी दिली नसल्याचे पाहून संशयितांनी ही जमीन परस्पर गोव्यातील रिअल इस्टेट कंपनीला विकली. हा प्रकार समोर येताच कुकरेजा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
करण परबच म्होरक्या असल्याचे तपासातून उघड
पोंबुर्फा व सांगोल्डा येथील जमीन परस्पर हडप प्रकाराचा म्होरक्या (मास्टर माईंड) करण गणपत परब असल्याचे पोलीस चौकशीतून उघडकीस आले आहे. संशयित साथीदारांच्या मदतीने बनावट कागदपत्रे तयार करून जमीन पालक आणि नातेवाईकांच्या नावे करणे व नंतर जमिनी गोव्यातील बिल्डरना विकण्याचे कट कारस्थान परब याने राबवले आहे. आणखी काही जमिनी संशयिताने लाटल्या आहेत का, याचा तपास म्हापसा व पर्वरी पोलीस करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा