आमदार वीरेश बोरकर यांची आरजीपीतून हकालपट्टी

शिस्तभंग प्रक्रिया पूर्ण; पक्षाने सदस्यत्व केले रद्द


27th July, 11:54 pm
आमदार वीरेश बोरकर यांची आरजीपीतून हकालपट्टी

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाने (आरजीपी) पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. शिस्तभंगाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द केल्याचे पत्र पक्षाने ई-मेलद्वारे पाठविले आहे. पक्षाचे सरचिटणीस विश्वेश नाईक यांनी बोरकर यांच्या हकालपट्टीचा आदेश जारी केला.
पक्षात फूट पाडून त्याचे दुसऱ्या पक्षात विलीनीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप बोरकर यांच्यावर करण्यात आला आहे. पक्षविरोधी कारवायांबाबत त्यांना १६ एप्रिल २०२६ रोजी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर २१ एप्रिल, २९ एप्रिल, ६ मे आणि १५ जून २०२६ रोजी स्मरणपत्रेही पाठविण्यात आली. मात्र, त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षाने स्पष्ट केले.
मडगाव येथे झालेल्या बैठकीत पक्षात फूट पाडून दुसऱ्या पक्षात विलीन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही पत्रात करण्यात आला आहे. पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत या कारवाईला विरोध झाल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचे पक्षाने म्हटले आहे.
निलंबनाचा आदेश अवैध : वीरेश बोरकर
आमदार वीरेश बोरकर यांनी पक्षाची कारवाई फेटाळून लावली. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मीच विश्वेश नाईक यांना निलंबित केले आहे, असा दावा त्यांनी केला. निलंबित पदाधिकाऱ्याला कोणालाही पक्षातून काढण्याचा अधिकार नाही. शिस्तपालन समिती स्थापन करण्यात आली असून, तीच निलंबित सदस्यांना समन्स बजावणार आहे, असेही आमदार वीरेश बोरकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा
सर्व पहा