पणजी : अनमोड घाटातील २०१९ मधील संगनगौडा अरहुनासी खून प्रकरणात मृताच्या पत्नीसह चार आरोपींची मडगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. मृताची पत्नी लक्ष्मी अरहुनासी, तसेच सुरेश पुजार, जगदीश दोडामणी आणि मुत्तण्णा अनावलड या चार जणांना न्यायालयाने दिलासा दिला. याबाबतचा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांनी दिला.
या प्रकरणाच्या सुनावणीवेळी न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर निरीक्षण नोंदवले. खून प्रकरणातील काही महत्त्वाच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची चौकशी करण्यात तपास अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच आरोपींकडून जप्त करण्यात आलेली दोरी, कपडे आणि अॅसिडच्या बाटल्या या सर्वसामान्यपणे बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तू आहेत. या वस्तू ज्या दुकानांतून खरेदी केल्याचा दावा पोलिसांनी केला होता, त्या दुकानदारांनी न्यायालयात आरोपींची ओळख पटवली नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
या प्रकरणी कुळे पोलिसांनी १७ जानेवारी २०१९ रोजी गुन्हा दाखल केला होता. अनमोड घाट परिसरात तोंड जळालेल्या अवस्थेत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. तपासादरम्यान तो मृतदेह संगनगौडा अरहुनासी याचा असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासाअंती पोलिसांनी मृताची पत्नी लक्ष्मी अरहुनासी, तिचा मित्र सुरेश पुजार, जगदीश दोडामणी आणि मुत्तण्णा अनावलड यांना १८ फेब्रुवारी २०१९ रोजी अटक केली होती. पोलिसांनी १६ मे २०१९ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
बचाव पक्षाचा युक्तिवाद मान्य
या प्रकरणात आरोपी लक्ष्मी अरहुनासी आणि सुरेश पुजार यांच्यावतीने अॅड. रोहन देसाई, जगदीश दोडामणी यांच्यावतीने अॅड. ए. देसाई, तर मुत्तण्णा अनावलड यांच्यावतीने अॅड. के. विगास यांनी बाजू मांडली. पुराव्यांमध्ये असलेल्या त्रुटी आणि आरोप सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश आल्याने न्यायालयाने चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
फोन कॉल डिटेल्सही ठरले अपुरे
न्यायालयीन सुनावणीदरम्यान पोलिसांकडून सादर करण्यात आलेले फोन कॉल डिटेल्स (सीबीआर) हे संभाषणाचा मुख्य पुरावा ठरू शकत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच घटनेच्या दिवशी मृत व्यक्ती आरोपींसोबत होती किंवा त्यांनी एकत्र प्रवास केला होता, हे सिद्ध करणारे ठोस पुरावे किंवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार न्यायालयासमोर सादर करण्यात आले नसल्याचे न्यायालयाने म्हटले.


