सायबर विभागाकडून अज्ञात मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल

पणजी : शेअर ट्रेडिंगमध्ये भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत बार्देश तालुक्यातील एका ४५ वर्षीय नागरिकाची २३.५० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर गुन्हे विभागाने अज्ञात व्हॉट्सअॅपधारकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला फेसबुकवर फिनसोल सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड या नावाची जाहिरात दिसली. कंपनी सेबीकडे नोंदणीकृत असल्याचे समजून त्यांनी संपर्क साधला. त्यानंतर ४४७५१३६९५२४३ या व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क करून त्यांना 'स्मार्ट अल्गो अकाऊंट' हे अॅप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले.
संशयितांनी शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त नफा मिळण्याचे आमिष दाखवून तक्रारदाराकडून विविध बँक खात्यांमध्ये एकूण २३.५० लाख रुपये जमा करून घेतले. अॅपमध्ये गुंतवणुकीची रक्कम वाढत असल्याचे दाखविण्यात आले. मात्र, पैसे काढण्याचा प्रयत्न करताच आणखी शुल्क भरण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे संशय आल्याने तक्रारदाराने चौकशी केली असता संबंधित कंपनी बनावट असल्याचे उघड झाले.
सायबर पोलिसांचा तपास सुरू
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर गुन्हे विभागात तक्रार दाखल केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(डी) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.