Home >> गोवा >> राज्यात २०२१ ते २०२५ दरम्यान दिवसाला १३४ व्यक्तींनी घेतला पासपोर्ट

राज्यात २०२१ ते २०२५ दरम्यान दिवसाला १३४ व्यक्तींनी घेतला पासपोर्ट

परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालातून माहिती उघड

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
26th July, 11:51 pm
राज्यात २०२१ ते २०२५ दरम्यान दिवसाला १३४ व्यक्तींनी घेतला पासपोर्ट

पणजी : गोव्यात २०२१ ते २०२५ दरम्यान २ लाख ४६ हजार १४२ पासपोर्ट जारी करण्यात आले. याचाच अर्थ वर्षाला सरासरी ४९,१४२ म्हणजेच दिवसाला सरासरी १३४ जणांनी पासपोर्ट घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे.

गेल्या काही वर्षात विदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्यांची अथवा नोकरी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बोटीवर काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या देखील अधिक आहे. याशिवाय कुटुंबासह विदेशी सहल करण्यात वाढ झाली आहे. यामुळे राज्यात पासपोर्ट घेणाऱ्या व्यक्तींमध्ये देखील वाढ होत आहे.

राज्यात २०१५ ते २०१९ दरम्यान वर्षाला ४२ ते ५५ हजार पासपोर्ट जारी करण्यात आले होते. २०२० मध्ये कोविडमुळे ही संख्या कमी झाली होती. २०२० मध्ये केवळ २८०८ जणांनी पासपोर्ट घेतला. २०२१ मध्ये ३४,२५५ जणांना पासपोर्ट जारी करण्यात आला. यानंतर कोविडचा प्रभाव कमी झाल्याने त्याच्या पुढील वर्षी ही संख्या पुन्हा वाढली. २०२२ मध्ये ५१,०२६ , २०२३ मध्ये ५६,९१०, २०२४ मध्ये ५३, ९८९ जणांनी तर २०२५ मध्ये ४९,९६२ जणांनी पासपोर्ट घेतला होता. जानेवारी ते मे २०२६ मध्ये राज्यातील २२,४८८ जणांना पासपोर्ट जारी करण्यात आला.

अहवालानुसार, संपूर्ण देशात २०२१ ते २०२५ दरम्यान ३.२१ कोटी जणांना पासपोर्ट जारी करण्यात आले. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, बिहार, केरळ या राज्यांत पासपोर्ट घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तर, ईशान्येकडील राज्यांसह छत्तीसगड, ओडिशामध्ये हे प्रमाण कमी आहे. संपूर्ण देशात पासपोर्ट जारी करण्याच्या कालावधीत लक्षणीय घट झाली आहे. २०१५ मध्ये पासपोर्ट जारी करण्यासाठी सरासरी २१ दिवसांचा कालावधी लागत होता. २०२५ मध्ये तो कमी होऊन सरासरी ६ दिवस इतका झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

गोवा प्रथम स्थानी

अहवालानुसार, २०२३ ते २०२५ दरम्यान कमी कालावधीत पासपोर्ट जारी करण्यात गोवा देशात आघाडीवर आहे. २०२३ आणि २०२४ मध्ये गोव्यात सरासरी दोन दिवसांत पासपोर्ट जारी करण्यात आला. २०२५ मध्ये हा कालावधी ३ दिवस झाला. यामध्ये पोलीस पडताळणीसाठी लागलेला कालावधी गृहीत धरण्यात आला नसल्याचे अहवाल म्हटले आहे. 

हेही वाचा
सर्व पहा