Home >> गोवा >> विरोधी पक्षांसोबत युतीबाबत लवकरच निश्चिती : चोडणकर

विरोधी पक्षांसोबत युतीबाबत लवकरच निश्चिती : चोडणकर

गोवा फॉरवर्डसोबतची आघाडी कायम; इतर पक्षांशीही होणार चर्चा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th July, 11:54 pm
विरोधी पक्षांसोबत युतीबाबत लवकरच निश्चिती : चोडणकर

मडगाव : गोवा फॉरवर्डसोबत यापूर्वीच युती आहे. इतर विरोधी पक्षांसोबत युतीबाबतची चर्चा होणे बाकी आहे. सरदेसाई व आपणही आता गोव्यात असून चर्चा केली जाईल. युती करताना काही अडचणी असतील तर त्यावर चर्चेतून मार्ग काढला जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या वाढदिनानिमित्त आमदार विजय सरदेसाई यांनी त्यांच्या निवासस्थानी जात शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चोडणकर यांनी सांगितले की, काँग्रेसची गोवा फॉरवर्ड पक्षासोबत युती आहे. ही युती आगामी निवडणुकीतही कायम राहील. ही युती कायम राहावी अशी इच्छा सर्व गोमंतकीयांची आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यास भाजपला दोनअंकी आकडा मिळवण्यातही अडचण निर्माण होईल. सध्या राज्यातील लोकांचा कलही भाजपविरोधातच आहे. निवडणूक लढण्याची इच्छा आपण व्यक्त केली आहे. निवडणूक कुठून लढायची याबाबतचा निर्णय हा पक्षाकडून घेण्यात येईल. त्यासाठी प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असेही स्पष्ट केले.
काँग्रेस हा जुना पक्ष असून त्यांनी शेवटच्या क्षणी निवडणुकांबाबतचे निर्णय न घेता निर्णय प्रक्रियेला वेग देण्याची गरज आहे. चोडणकर यांनी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे सांगितले असून त्यांनी कुठून लढणार ते निश्चित करावे व जिंकावे. जिंकण्यासाठी काँग्रेस पक्षाने निवडणुकीसंदर्भातील वेळकाढू धोरण सोडून लवकर निर्णय घ्यावेत, असे आमदार सरदेसाई म्हणाले.
काँग्रेससोबत युती होणार हे निश्चित आहे. राज्यातील जनतेला भाजप नको आहे. त्यांची ही भावना जाणून घेत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. गिरीश चोडणकर यांनी दोन वर्षांपूर्वी प्रदेशाध्यक्षपदी येण्याची गरज होती. त्यावेळी झाले नाही पण आता ते प्रदेशाध्यक्ष असून ते लवकर निर्णय घेतील, असे आमदार सरदेसाई यांनी सांगितले.
निवडणुका लांबणीवर टाकण्याची शक्यता
सध्या जेन झीकडून देशभरात निदर्शने केली जात आहेत. विद्यार्थ्यांची ही ताकद पाहून भाजप हादरलेला असणार त्यामुळे आगामी निवडणुका आणखी लांबणीवर टाकण्याचीही शक्यता आहे. गोव्यातही भाजपची स्थिती तशीच वाईट आहे. भाजपविरोधात लोक रस्त्यावर आले आहेत, हे केवळ नीट परीक्षेचे पेपर फुटल्याने झाले नाही तर लोकांच्याही मनात या सरकारच्याविरोधात संताप आहे, असे आमदार सरदेसाई यांनी सांगितले.            

हेही वाचा
सर्व पहा