Home >> गोवा >> वीरेश बोरकरांच्या अधिकारांवर अजय खोलकरांचा आक्षेप

वीरेश बोरकरांच्या अधिकारांवर अजय खोलकरांचा आक्षेप

आरजीच्या जुन्या घटनेवरून नवा वाद; सुधारित घटना ग्राह्य धरण्याची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th July, 11:53 pm
वीरेश बोरकरांच्या अधिकारांवर अजय खोलकरांचा आक्षेप

पणजी : रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षात (आरजी) पुन्हा एकदा अंतर्गत वाद उफाळून आला असून, पक्षाच्या घटनेवरून दोन गटांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेल्या पक्षाच्या घटनेनुसार वीरेश बोरकर हे राष्ट्रीय अध्यक्ष असून त्यांना शिस्तभंगाची कारवाई करण्याचे अधिकार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, अजय खोलकर यांनी ही घटना कालबाह्य व चुकीची असल्याचा दावा करत त्यावर आक्षेप घेतला आहे.
खोलकर यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर पक्षाची जुनी घटना अपलोड करण्यात आली आहे. पक्षाने यापूर्वी सुधारित घटना आयोगाकडे सादर केली असून त्यात राष्ट्रीय कार्यकारी समितीऐवजी कोअर समितीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, कोणत्याही एका व्यक्तीला पक्षविरोधी कारवाईचे अधिकार नसून, अशा निर्णयांचा अधिकार कोअर समितीकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील जुन्या घटनेत वीरेश बोरकर यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नोंद असल्याने त्यांनी अलीकडे घेतलेल्या निर्णयांना वैधता मिळाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, ही परिस्थिती आयोगाच्या तांत्रिक चुकीमुळे निर्माण झाल्याचे खोलकर यांनी म्हटले.
आयोगाकडे आक्षेप नोंदवणार
१३ फेब्रुवारी २०२६ मध्ये आयोगाच्या सूचनेनुसार सुधारित घटना कागदी स्वरूपात सादर करण्यात आली होती. मात्र, ती अपलोड न करता जुनीच घटना संकेतस्थळावर ठेवण्यात आल्याचा आरोप खोलकर यांनी केला. याबाबत निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवण्यात आला असून, वीरेश बोरकर यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून असलेली नोंद रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. सोमवारी यासंदर्भातील अतिरिक्त कागदपत्रे आयोगाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.            

हेही वाचा
सर्व पहा