आझाद मैदानावर विविध संघटनांची आंदोलने, तर मोरजीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच

पणजी : युवकांना ‘वाळवी’ म्हटल्याबाबत नरेंद्र सावईकर यांनी माफी मागावी, ‘नीट’ पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, यासह अन्य मागण्यांसाठी पणजीतील आझाद मैदानात विविध संघटनांनी आंदोलन केले. तेमवाडा - मोरजीतील २३ अनधिकृत बांधकामांवर कारवाई मोहीम सुरू आहे. याशिवाय फसवणूक, चोरीच्या घटना घडल्या आहेत. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.
रविवार
आमदार जेनिफर मोन्सेरात यांचे निधन
माजी मंत्री आणि ताळगावच्या विद्यमान भाजप आमदार जेनिफर मोन्सेरात यांचे दोनापावला येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये वयाच्या ५६व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मंत्री, आमदार तसेच विविध पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाबद्दल राज्य सरकारने दोन राज्यात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.
बोरी ग्रामस्थ पाणी, कचऱ्याच्या प्रश्नावरून आक्रमक
बोरी पंचायतीची ग्रामसभा पाणी आणि कचऱ्याच्या प्रश्नावरून गाजली. शिरशिरे, डब, करसंगे, आफ्रामेत व अन्य भागात पाण्याची समस्या कायम असल्याने ग्रामसभेत काही वेळ तणाव निर्माण झाला. ‘हर घर जल’ ऐवजी बोरी परिसरात पाण्यासाठी ‘हर घर छळ’ होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
बांबोळी येथे भीषण अपघात
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) इस्पितळासमोरील फ्लायओव्हरवर चार वाहनांची एकमेकांना जोरदार धडक बसून एक भीषण व विचित्र अपघात घडला. या अपघातात एक आय-२० कार हवेत उसळून थेट दुसऱ्या कारच्या छतावर उलटली. या भीषण साखळी अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
सोमवार
तेमवाडा - मोरजीतील २३ अनधिकृत बांधकामांवर हातोडा
मोरजी येथील तेमवाडा परिसरातील सीआरझेड (कोस्टल रेग्युलेशन झोन) नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या २३ बांधकामांवर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारी यंत्रणेने बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे किनारपट्टी भागात मोठी खळबळ उडाली असून, स्थानिकांनी याविरोधात प्रशासनाकडे न्यायाची मागणी करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ज्येष्ठ नागरिकाची १२.१४ लाखांची फसवणूक
ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून तिसवाडी तालुक्यातील एका ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची १२ लाख १४ हजार ५२७ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने अज्ञात मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल केला.
सुरावली येथे रेल्वेच्या धडकेत अनोळखी तरुणाचा मृत्यू
सुरावली येथे रेल्वेची धडक बसल्याने २५ ते ३० वयोगटातील अज्ञात इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोकण रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली असून, पुढील तपास सुरू केला आहे.
मंगळवार
बोर्डे-डिचोली येथील फ्लॅटला आग लागून मोठी हानी
नाईकनगर बोर्डे डिचोली येथील श्री सिद्धिविनायक मंदिरामागे असलेल्या एका बंद फ्लॅटमध्ये आग लागून फ्लॅटमधील अगरबत्ती मसाले व इतर सामान जळून खाक झाले. सदर फ्लॅट बंद ठेवून मालक बाहेर गेले असता फ्लॅटला आग लागण्याची घटना घडली. अग्निशामक दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेऊन आतील आग आटोक्यात आणली व संपूर्ण फ्लॅट आगीच्या भक्ष्यस्थानी जाण्यापासून वाचविला.
अॅड. अंकुर कुमार हल्लाप्रकरणी पिता-पुत्राचा जामीनअर्ज फेटाळला
मोरजी येथे अॅड. अंकुर कुमार यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणातील प्रथमदर्शनी सीसीटीव्ही चित्रफीत, वैद्यकीय अहवाल, साक्षीदारांची साक्ष व इतरांची दखल घेतल्यास हे गंभीर प्रकरण आहे, असे निरीक्षण नोंदवून पेडणे प्रथमवर्ग न्यायालयाने संशयित दिलीप उर्फ लोशन मोरजे व ध्रुव मोरजे या पिता-पुत्राचा जामीन अर्ज फेटाळून लावला. तसेच त्या दोघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.
हणजूणमध्ये जमीन फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंद
हणजूण येथील एका जमिनीच्या व्यवहारात मालकी हक्क असल्याचा खोटा दावा करून हरियाणातील व्यक्तीची १.९५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी, दिल्लीचे मूळ रहिवासीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बुधवार
पणजीतील आझाद मैदानात आंदोलन
युवकांना ‘वाळवी’ म्हटल्याबाबत नरेंद्र सावईकर यांनी माफी मागावी, ‘नीट’ पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, यासह अन्य मागण्यांसाठी आझाद मैदानात विविध संघटनांनी आंदोलन केले. यावेळी शंभरहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. आप, काँग्रेस पक्षांतील पदाधिकाऱ्यांसह विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
ईडीने ड्रग्ज तस्कराच्या आवळल्या मुसक्या
ड्रग्ज तस्करी प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) गोवा विभागाने मोठी कारवाई करत दुबईहून मुंबईत आलेल्या निहाल व्ही. एन. (३९, केरळ) याला मुंबई विमानतळावर अटक केली. मेरशी येथील विशेष (पीएमएलए) न्यायालयाने त्याला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. संशयित निहाल हा ब्राझील आणि थायलंडमधून होणाऱ्या ड्रग्ज तस्करीसाठी क्रिप्टोकरन्सी आणि इतर विदेशी चलनाची व्यवस्था करत असल्याचा आरोप आहे.
गुरुवार
धारगळ टोलनाका तोडफोड प्रकरणी मंत्री नीतेश राणेंसह नऊ जण निर्दोष
दोनखांब-धारगळ येथील टोलनाका तोडफोड आणि सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या खटल्यातून महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय मंत्री तथा कणकवलीचे आमदार नीतेश राणे यांच्यासह नऊ जणांची म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सरकारी पक्षाला आरोपींवरील आरोप सिद्ध करण्यात अपयश आल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निवाडा दिला.
नाझरी रिसॉर्टचे मालक मायकल लोबो, फ्रेन्की निर्दोष
बागा-कळंगुट येथील नाझरी रिसॉर्टचे बांधकाम करताना गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाचे (जीसीझेडएमए) बनावट पत्र तयार करून फसवणूक केल्याच्या खटल्यातून म्हापसा न्यायालयाने मालक तथा आमदार मायकल लोबो आणि फ्रान्सिस (फ्रेन्की) व्हिएगस यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे.
सत्तरीत वादळी वाऱ्याचा कहर
सत्तरी तालुक्यात वादळी वाऱ्याने धुमाकूळ घातला. म्हाऊस, सालेली, शिर-सावर्डे, घोलवाडा-पर्ये आणि बुद्रुक करमळी येथे झाडे व घराची भिंत कोसळल्याने चार घरांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. सुदैवाने सर्व घटनांमध्ये जीवितहानी टळली.
शुक्रवार
वकिलावरील हल्ला प्रकरणी मोरजे यांच्या मुलीला अटक
मोरजी येथील अॅड. अंकुर कुमार यांच्यावरील कथित प्राणघातक हल्ला प्रकरणात पोलिसांनी दिलीप मोरजे यांची कन्या दीपिका तारी या संशयितेला अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण तिघांना अटक झाली आहे. तपासादरम्यान दिलीप मोरजे यांच्या मुलीचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी तिची चौकशी केली. आवश्यक पुरावे आणि उपलब्ध माहितीच्या आधारे तिला अटक करण्यात आली.
बिटकॉइनद्वारे जास्त मोबदल्याच्या आशेपोटी गमावले ३५.५० लाख रुपये
बिटकॉइन मायनिग ट्रेडिंगमध्ये जास्त मोबदला देण्याचे आमिष दाखवून सासष्टी तालुक्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला ३५.५० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी सायबर विभागाने अज्ञात मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल केला.
म्हापशात गॅलरीचा सज्जा कोसळून सहा कामगार जखमी
डांगी कॉलनी म्हापसा येथील एम. ए. रिअल्टी या बांधकाम प्रकल्पाच्या गॅलरीचा सज्जा कोसळून सहा कामगार जखमी झाले होते. या दुर्घटनेप्रकरणी बांधकाम कंपनीचे कंत्राटदार आणि साईट अभियंत्याविरुद्ध म्हापसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
शनिवार
चांदेल येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात बिघाड
चांदेल येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात मोठा बिघाड झाल्यामुळे पेडणे तालुक्यातील पाणी पुरवठा खंडित झाला. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
लक्षवेधी
आसगाव येथे पर्यटकांच्या एका गटाने स्थानिक नागरिकांवर एअरगन रोखून त्यांना मारहाण केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी सदर पर्यटकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
पोलीस स्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार गोवा पोलीस खात्यात मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, ५ पोलीस उपनिरीक्षकांसह ७८१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात ८१ महिला कर्मचाऱ्यांचा तसेच १० चालकांचा समावेश आहे. याबाबतचा आदेश मुख्यालयाचे अधीक्षक तुषार वेर्णेकर यांनी जारी केला आहे.
तेमवाडा मोरजी येथील स्थानिक भूमिपुत्र मच्छीमार व्यावसायिकांची पिढ्यान्पिढ्या असलेली पारंपरिक घरे वाचवावीत, अन्यथा स्थानिकांना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा स्थानिक मच्छीमार व्यावसायिकांसह विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींनी आयोजित बैठकीत दिला.
जमीन किंवा इतर स्थावर मालमत्तांच्या व्यवहारांची नोंदणी आता संबंधित जिल्ह्यातील कोणत्याही उपनिबंधक (सब-रजिस्ट्रार) कार्यालयात करता येणार आहे. उदाहरणार्थ, जमीन पेडणे तालुक्यात असली तरी तिचा विक्री करार (सेल डीड) किंवा इतर व्यवहार वाळपई येथील कार्यालयात नोंदवता येईल. मात्र, एका जिल्ह्यातील मालमत्तेची नोंदणी दुसऱ्या जिल्ह्यातील उपनिबंधक कार्यालयात करता येणार नाही.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना गोव्यात २६ ठिकाणी बसवलेल्या एआय कॅमेऱ्यांवरून १ ऑगस्टपासून ‘तालांव’ (चलन) जारी होण्यास सुरुवात होणार आहे. सुरुवातीला सर्व काही ठरावीक नियमांसाठीच दंड आकारला जाईल. दंडाची रक्कमही कमीतकमी राहणार आहे, असे वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.