Home >> गोवा >> माटणे अपघातातील जखमी जयराम शिरोडकर यांचे निधन; मृतांची संख्या २ वर

माटणे अपघातातील जखमी जयराम शिरोडकर यांचे निधन; मृतांची संख्या २ वर

अपघातात मये-डिचोलीचे दीपक हरमलकर यांचा घटनास्थळीच झाला होता मृत्यू.

Story: वेब डेस्क | गोवन वार्ता |
just now
माटणे अपघातातील जखमी जयराम शिरोडकर यांचे निधन; मृतांची संख्या २ वर

दोडामार्ग : येथील माटणे गावाजवळ बुधवारी झालेल्या भीषण दुचाकी अपघातातील गंभीर जखमी जयराम शिरोडकर (३८, रा. माटणे-तळेवाडी) यांचे शुक्रवारी पहाटे गोमेकॉ, बांबोळी येथे उपचार सुरू असताना निधन झाले. या दुर्दैवी घटनेमुळे माटणे अपघातातील मृतांची संख्या आता दोनवर पोहोचली असून, संपूर्ण दोडामार्ग आणि डिचोली परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

बुधवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास दोडामार्ग ते आयी मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. या दुर्घटनेत मये-डिचोली येथील रहिवासी दीपक हरमलकर (४५) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता, तर गणो लक्ष्मण उसपकर (२५, रा. मये-डिचोली), जयराम शिरोडकर आणि रामा सुरेश गवस (२४, रा. वजरे-दोडामार्ग) हे गंभीर जखमी झाले होते.

स्थानिकांनी तातडीने धाव घेऊन जखमींना प्रथमोपचारासाठी दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना पुढील उपचारासाठी म्हापसा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने जयराम शिरोडकर आणि गणो उसपकर यांना तातडीने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) हलवण्यात आले. मात्र, गेली दोन दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या जयराम यांची प्राणज्योत शुक्रवारी पहाटे मालवली. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.

घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली व जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा