Home >> गोवा >> मोपा 'फॉर्म्युला ४'चे २ कोटींचे वीज बिल माफ; काँग्रेस आक्रमक

मोपा 'फॉर्म्युला ४'चे २ कोटींचे वीज बिल माफ; काँग्रेस आक्रमक

आयोजकांकडून २ कोटी रुपयांचे वीज शुल्क तात्काळ वसूल करण्याची मागणी.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
मोपा 'फॉर्म्युला ४'चे २ कोटींचे वीज बिल माफ; काँग्रेस आक्रमक

पणजी : मोपा येथे पार पडलेल्या 'फॉर्म्युला ४' कार सर्किट रेसिंग स्पर्धेसाठी वापरण्यात आलेल्या विजेच्या वापरापोटीचे सुमारे २ कोटी रुपयांचे शुल्क माफ करण्याच्या कथित निर्णयावर गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे (GPCC) कार्याध्यक्ष सुनील कवठणकर यांनी तीव्र आक्षेप नोंदवला . हा निर्णय करदात्यांच्या पैशांवर खाजगी आयोजकांचा फायदा करून देणारा असल्याचा आरोप त्यांनी केला असून या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र पाठवून सदर निर्णय त्वरित मागे घेण्याची आणि प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.



राज्यातील सामान्य नागरिक, लहान व्यावसायिक आणि मध्यमवर्गीय ग्राहक वाढीव वीज बिलांचा सामना करत असताना, अशा प्रकारे एका खाजगी व्यावसायिक क्रीडा स्पर्धेचे वीज बिल माफ करणे पूर्णपणे अयोग्य असल्याचे सुनील कवठणकर यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे फॉर्म्युला ४ स्पर्धेच्या आयोजकांकडून हे संपूर्ण २ कोटी रुपयांचे वीज शुल्क तात्काळ वसूल करण्यात यावे, अशी आग्रही मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.


2019 International Formula 4 season review - Formula Scout


प्रशासनात पारदर्शकता राहावी यासाठी या निर्णयाशी संबंधित सर्व सरकारी फायली, टीप (Notings) आणि बैठकांचे वृत्तांत (Minutes of Meeting) जनतेसमोर उघड करण्यात यावेत, असेही त्यांनी म्हटले आहे. या निर्णयात अधिकारांचा गैरवापर किंवा अनियमितता झाली आहे का, याची निष्पक्ष तपासणी करण्यासाठी एका उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी समितीची स्थापना करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही स्पर्धा एक व्यावसायिक उपक्रम असल्याने यातील सर्व खर्च व वीज शुल्क हे आयोजकांनीच भरणे अपेक्षित आहे, त्यामुळे सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे स्पष्ट करत काँग्रेसने सरकारला धारेवर धरले आहे.



हेही वाचा
सर्व पहा