४ कोटींचे सोने; एसीबीच्या अधिकाऱ्यांनाही धक्का

हैदराबाद : तेलंगणातील एका सरकारी विभागीय अभियंत्याच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) टाकलेल्या धाडीत तब्बल १५० कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेहिशेबी संपत्ती उघडकीस आली आहे. कारवाईदरम्यान २ किलोहून अधिक सोन्याचे दागिने, लाखो रुपयांची रोख रक्कम, आलिशान फ्लॅट्स, बहुमजली इमारती, महागड्या गाड्या आणि मोठ्या प्रमाणावर रिअल इस्टेटमधील गुंतवणूक आढळल्याने तपास अधिकाऱ्यांनाही धक्का बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमध्ये कार्यरत असलेले विभागीय अभियंता मुत्यम व्यंकट रमणा यांच्याविरोधात बेनामी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर एसीबीने त्यांच्या निवासस्थानासह कार्यालय, नातेवाईक, व्यावसायिक भागीदार आणि संबंधित व्यक्तींच्या विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली.
प्राथमिक तपासात रमणा यांनी आपल्या अधिकृत उत्पन्नापेक्षा कितीतरी पटीने जास्त मालमत्ता जमा केल्याचे समोर आले. तपासात सेरिलिंगमपल्ली आणि कुकटपल्ली येथे चार फ्लॅट्स, कुकटपल्लीतील तीन मजली इमारत, गुट्टाला येथील पाच मजली इमारत तसेच पत्नीच्या नावावर विविध कंपन्यांमार्फत रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचे उघड झाले. अंजनेया नगर परिसरातील अपार्टमेंट प्रकल्पांमध्ये सुमारे २० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहितीही समोर आली आहे.
छाप्यात बँक खात्यांमध्ये ५२ लाख रुपयांची ठेव, सुमारे ४ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, ४५ लाख रुपये किमतीच्या तीन आलिशान कार, ३० लाख रुपयांचे घरगुती साहित्य तसेच महागडे विदेशी मद्यही जप्त करण्यात आले.
मालमत्तेचे एकूण मूल्य १५० कोटी रुपये
एसीबीच्या प्राथमिक अंदाजानुसार, अभियंता रमणा यांच्याकडे असलेल्या एकूण मालमत्तेचे मूल्य सुमारे १५० कोटी रुपये आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, बेनामी गुंतवणूक आणि मालमत्तेचे स्रोत यांचा आता सखोल तपास सुरू आहे. आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.