Home >> देश -परदेश >> सीजेपी आंदोलनानंतर आरएएफ अधिकारी सोनिया वादाच्या भोवऱ्यात

सीजेपी आंदोलनानंतर आरएएफ अधिकारी सोनिया वादाच्या भोवऱ्यात

मृत झुरळाचा पोस्ट शेअर करणे पडले महागात

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
सीजेपी आंदोलनानंतर आरएएफ अधिकारी सोनिया वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली: 'संसद चलो' आंदोलनादरम्यान झालेल्या गोंधळानंतर रॅपिड अॅक्शन फोर्सच्या (RAF) सहाय्यक कमांडंट सोनिया शेरावत या नव्या वादाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. त्यांच्या कथित इन्स्टाग्राम स्टोरीमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी त्यांच्यावर तीव्र टीका केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मृत झुरळाचे (Cockroach) छायाचित्र असलेल्या एका रिलला शेअर करण्यात आले होते. त्यावर "स्वतःला सुधारता येत नाही, पण देश सुधारण्याच्या गोष्टी करतात," असा मजकूर होता. या पोस्टचा संदर्भ सीजेपीच्या आंदोलनाशी जोडला गेल्याने वाद निर्माण झाला.

आंदोलनावेळी झालेल्या कारवाईबाबत शेरावत यांचे स्पष्टीकरण

दिल्लीतील आंदोलनादरम्यान आरएएफ तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या सोनिया शेरावत यांनी आंदोलनकर्त्यांवर महिला जवानांनी अत्याचार केल्याचे आरोप फेटाळून लावले. त्यांनी सांगितले की, आरएएफ जवानांना महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते. आणि त्यांच्या पथकाकडून कोणतीही जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी गैरवर्तणूक झालेली नाही.

चेंगराचेंगरीसदृश परिस्थितीनंतर स्वत: जखमी : शेरावत

त्यांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनकर्त्यांना सुरक्षित अंतर राखण्याचे वारंवार आवाहन करण्यात आले होते. मात्र, चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या स्वतःही जखमी झाल्या. जमिनीवर पडल्यावर त्यांच्यावर दगड व चपला फेकण्यात आल्या. आणि काही आंदोलकांनी त्यांचे हेल्मेटही काढून घेतल्याचा दावा त्यांनी केला.

११८ पोलीस कर्मचारी जखमी 

शेरावत यांनी सांगितले की, आरएएफचा एक जवान आंदोलकांच्या गर्दीत ओढला गेला होता. त्यानंतर जवानांनी स्वसंरक्षणासाठी कारवाई केली. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, या आंदोलनादरम्यान एकूण ११८ पोलीस कर्मचारी जखमी झाले.

महुआ मोइत्रा यांची टीका

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये सोनिया शेरावत यांच्या कथित इन्स्टाग्राम स्टोरीचा स्क्रीनशॉट शेअर करत त्यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. आंदोलनकर्त्यांना "झुरळे" संबोधणारी मानसिकता धक्कादायक असल्याचे सांगत त्यांनी शेरावत यांची ओळख, कार्यपद्धती आणि सेवा नोंदी सार्वजनिक करण्याची मागणी केली.

सीजेपीची प्रतिक्रिया

महुआ मोइत्रा यांच्या पोस्टनंतर सीजेपीनेही सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आरएएफ अधिकाऱ्यांच्या कथित पोस्टवर आक्षेप घेतला. "आम्ही झुरळे असलो, तरी झुरळे कधी मरत नाहीत," असे म्हणत पक्षाने आंदोलनकर्त्यांविषयी अशा प्रकारची भाषा वापरणे निषेधार्ह असल्याचे म्हटले.

सोनिया शेरावत कोण आहेत?

सोनिया शेरावत या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) मध्ये सहाय्यक कमांडंट म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी राष्ट्रीय छात्र सेना (NCC) मध्ये काम केले आहे. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) सहाय्यक कमांडंट परीक्षेत यश मिळवून सीआरपीएफ मध्ये प्रवेश केला. दंगल नियंत्रण, कायदा-सुव्यवस्था आणि गर्दी नियंत्रण ही त्यांची प्रमुख जबाबदारी आहे.

हेही वाचा
सर्व पहा