Home >> देश -परदेश >> 'माऊली'चा गजर दुमदुमला रशियातील अवकाशात !

'माऊली'चा गजर दुमदुमला रशियातील अवकाशात !

१२ हजार फूट उंचीवरून अजित कारभारी यांचे विठ्ठलाला अनोखे साकडे

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
'माऊली'चा गजर दुमदुमला रशियातील अवकाशात !

मुंबई : महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा आणि विठ्ठल भक्तीचा जागतिक स्तरावर गौरव करणारा अनोखा पराक्रम कल्याणच्या साहसी खेळाडू अजित बळीराम कारभारी यांनी केला आहे. आषाढी एकादशीचे औचित्य साधत त्यांनी रशियात तब्बल १२ हजार फूट उंचीवरून स्कायडायव्हिंग करत विठ्ठलाची प्रतिमा असलेला ध्वज आकाशात फडकावून विठूरायाला अनोखे साकडे घातले आहेत. त्यानिमित्ताने रशियाच्या अवकाशात ‘माऊली’चा गजर दुमदुमला. (The chant of 'Mauli' echoes in Russian airspace!)  

प्रसिद्ध कुस्तीपटू बळीराम कारभारी यांचे सुपुत्र असलेल्या अजित कारभारी यांनी ६ जुलै रोजी रशियात ही साहसी उडी घेतली. यावेळी त्यांनी वारकरी संप्रदायाचा पारंपरिक पोशाख परिधान केला होता.  हवेत झेपावताना **'राम कृष्ण हरी'**चा अखंड जप करत त्यांनी महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा संदेश जगभर पोहोचवला.

रशियन लष्करी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन

या धाडसी मोहिमेसाठी अजित यांनी रशियन सैन्याचे मुख्य प्रशिक्षक कोस्त्या क्रीवोत्सिव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रशिक्षण घेतले होते. अत्यंत आव्हानात्मक स्कायडायव्हिंग मोहिमेदरम्यान त्यांनी धाडस आणि भक्तीचा सुंदर संगम घडवून आणत आंतरराष्ट्रीय स्तरावर वारकरी संस्कृतीची वेगळी ओळख निर्माण केली.

भक्ती, सकारात्मकता आणि समाजसेवेचा संदेश

या उपक्रमाबाबत बोलताना अजित कारभारी म्हणाले, "या मोहिमेचा उद्देश केवळ साहस दाखवणे नव्हता. भक्ती, सकारात्मक विचार आणि मानसिक बळाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे हेच माझे ध्येय होते. युवकांनी भक्तीमार्ग स्वीकारून आपल्या ऊर्जेचा उपयोग देशसेवा आणि समाजकल्याणासाठी करावा."

अजित कारभारी यांच्या या अनोख्या पराक्रमाचे देश-विदेशातील विठ्ठल भक्तांकडून तसेच नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. महाराष्ट्राची आध्यात्मिक परंपरा आणि आधुनिक साहसी क्रीडा यांचा सुंदर मिलाफ घडवून कल्याणच्या या सुपुत्राने राज्याचा मान आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावला आहे.

हेही वाचा
सर्व पहा