सप्टेंबरपासून नवे नियम लागू होणार

पॅरिस : फ्रान्सने १५ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडियाच्या वापरावर निर्बंध घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. फ्रेंच संसदेने यासंदर्भातील विधेयक मंजूर केले असून, घटनात्मक परिषदेची (Constitutional Council) अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर हे नियम सप्टेंबरपासून लागू करण्याचे लक्ष्य राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जाहीर केले आहे.
या निर्णयानुसार, १५ वर्षांखालील मुलांना टिकटोक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट (TikTok, Instagram, Snapchat ) यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाते उघडता किंवा वापरता येणार नाही. मुलांचे ऑनलाईन संरक्षण आणि सोशल मीडियाच्या वाढत्या दुष्परिणामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
फ्रान्सच्या सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणाने (Public Health Authority) गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेल्या अहवालात टिकटोक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट यांसारख्या प्लॅटफॉर्मचा किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्य, झोप, एकाग्रता आणि वर्तनावर नकारात्मक परिणाम होत असल्याचा इशारा दिला होता.
विधेयक मंजूर झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर प्रतिक्रिया देताना, "मी दिलेले आश्वासन आता पूर्ण झाले आहे. शाळा सुरू होताच १५ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी लागू केली जाईल. आता घटनात्मक परिषदेच्या मंजुरीनंतर या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करून आपल्या मुलांचे ऑनलाइन संरक्षण करणे हे पुढचे पाऊल असेल," असे म्हटले.
ऑस्ट्रेलियानंतर फ्रान्स
यापूर्वी ऑस्ट्रेलियाने डिसेंबर २०२५ मध्ये १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया खात्यांवर निर्बंध घालणारा कायदा मंजूर करून जगातील पहिले राष्ट्र बनण्याचा मान मिळवला होता. आता फ्रान्स हा युरोपियन संघातील (EU) असा निर्णय घेणारा पहिला देश ठरणार आहे.