काँग्रेसची केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
नवी दिल्ली : दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केंद्र सरकारविरोधातील आक्रमक भूमिका अधिक तीव्र केली आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार प्रियांका गांधी आणि इतर काँग्रेस खासदारांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध केला.
यावेळी आंदोलकांनी "तानाशाही बंद करा", "नरेंद्र मोदी गुंडागर्दी नाही चालणार", "अमित शहा गुंडागर्दी नाही चालणार" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाविरोधातील आंदोलनाला देशभरातील विद्यार्थी आणि विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनात कॉकरोच जनता पार्टीसह अनेक विद्यार्थी संघटनांनी सहभाग घेतला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
काँग्रेसनेही याच मागणीला पाठिंबा देत पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन छेडले. राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड करणाऱ्या सरकारला जबाबदार धरत केंद्राने या प्रकरणावर तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली.
दरम्यान, आंदोलनाला विविध विरोधी पक्षांचाही पाठिंबा मिळू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जंतर-मंतर येथे जाऊन आंदोलकांची भेट घेतली. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही आंदोलकांची भेट घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे केंद्र सरकारवरील राजकीय दबाव वाढत आहे. पुढील काही दिवसांत या आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.