फातोर्डा पोलिसांची कारवाई : सहा महिन्यांपासून होते पसार

मडगाव : घोगळ येथील सुन्नी गुलिस्तान मशिदीचे उपाध्यक्ष अली खान यांच्या खून प्रकरणात संशयित मेहबूब मकानदार (रा. हाउसिंग बोर्ड, घोगळ) आणि अलाउद्दीन सय्यद (रा. अमृत नगर, फातोर्डा) यांना फातोर्डा पोलिसांनी अटक केली. सहा महिन्यांपासून त्यांचा शोध घेण्यात येत होता. गेल्या आठवड्यात संशयित ताज मकानदार व रिझवान सय्यद यांना अटक केली होती.
खूनाची ही घटना ३० जानेवारी रोजी घडली होती. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीच्या आवारातच अली खान यांच्या पोटात चाकू खुपसून त्यांची हत्या केली होती. मशीद समितीवर वर्चस्वाच्या वादातून झालेल्या वादानंतर खुनाची घटना घडल्याचे तपासात समोर आले होते. या घटनेनंतर काही दिवस सुन्नी गुलिस्तान मशीद बंद ठेवली होती.
फातोर्डा पोलिसांनी या खून प्रकरणात आतापर्यंत अनेक संशयितांना अटक केली आहे. मुख्य सूत्रधार अक्रम खान याच्यासह आलम सय्यद, लतीफ सय्यद, उबेद्दुला मकंदर, सक्रुद्दिन शेख, हुसेन खान, निजामुद्दीन सय्यद आणि साहिल कन्वी उर्फ स्पाकी यांना यापूर्वी अटक करण्यात आली. या प्रकरणातील आणखी एक पसार संशयित अल्ताफ शाह सय्यद हा गुन्ह्यानंतर दुबईला पळून गेला होता.
लुकआउट नोटीसच्या आधारे त्याला बंगळुरू विमानतळावर उतरताच अटक करण्यात आली होती. मुख्य संशयित अक्रम खान आणि साहिल कन्वी हे दोघे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, तर इतर काही संशयितांना जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणातील सर्व संशयितांवर खुनाचा व कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात या खून प्रकरणात फातोर्डा पोलिसांनी संशयित ताज मकानदार आणि रिझवान सय्यद यांना अटक केली व ते संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणात आता फातोर्डा पोलीस निरीक्षक राहुल आणि त्यांच्या पथकाने गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेल्या या दोन्ही संशयितांच्या मुसक्या आवळल्या.
या गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि चोरी झालेली रोकड लवकरच जप्त केली जाण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याशिवाय गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत संशयितांचा शोध घेतला जात असताना त्यांना कोणी आसरा दिला किंवा मदत केली का, या दृष्टीनेही तपास यंत्रणा कसून चौकशी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.