दोघे बचावले; एसयूव्ही तलावात कोसळली

ढेंकानाल (ओडिशा) : लग्न सोहळ्यासाठी निघालेल्या वरातीवर काळाने घाला घातला. त्यात पाचजण मृत्यू पावण्याची ह्रदयद्रावक घटना घडली. ओडिशातील ढेंकानाल जिल्ह्यात गुरुवारी पहाटे भरधाव एसयूव्हीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्या लगतच्या तलावात कोसळले. या भीषण अपघातात पाच जणांचा बुडून मृत्यू झाला, तर दोन जणांना ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढून जीव वाचवला.
ही दुर्घटना पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास मोटांगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छाटिया गावाजवळ घडली. बंगूर सिंग गावातून इंदीपूर येथे लग्नासाठी वरात निघाली होती. वाटेत वळणावर भरधाव एसयूव्हीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. वाहन उलटून थेट रस्त्यालगतच्या तलावात कोसळले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धावले. त्यांनी वाहनाचे दार फोडून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले आणि १०८ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वाहनातील पाच जणांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला.
मृतांमध्ये चंद्रकांत स्वाईन (चालक), अविनाश साहू, राकेश साहू, श्रीराम साहू (सर्व बंगूर सिंग गावातील) तसेच अभिजित साहू (सिमिनाई गाव) यांचा समावेश आहे.
या अपघातातून बाबुल साहू आणि सौम्य रंजन साहू हे दोघे बचावले. त्यांच्यावर जिल्हा मुख्यालय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.
घटनेची माहिती मिळताच ढेंकानाल सदर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तलावातून अपघातग्रस्त एसयूव्ही बाहेर काढली. मृतदेह शवचिकीत्सेसाठी पाठविण्यात आले. त्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे मृतांच्या गावांमध्ये शोककळा पसरली आहे. भरधाव वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.