
पणजी : पश्चिम घाटातील जैवविविधता नेहमीच निसर्गप्रेमींसाठी आणि शास्त्रज्ञांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. याच सह्याद्रीच्या कुशीत महाराष्ट्रातील आंबोली आणि गोव्यातील हॅथीपाल परिसरामध्ये 'घाटीआना अॅट्रोपुर्प्युरिया' (Ghatiana atropurpurea) नावाच्या अत्यंत दुर्मीळ आणि वैशिष्ट्यपूर्ण खेकड्याची नोंद झाली आहे. स्थानिक भाषेत 'जांभळा वन खेकडा' किंवा 'पर्पल ट्री क्रॅब' म्हणून ओळखला जाणारा हा जीव त्याच्या अनोख्या रंगरूपामुळे चर्चेचा विषय बनला आहे.
या खेकड्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा जांभळा रंग, जो हुबेहूब जांभळाच्या फळासारखा दिसतो. निसर्गातील हा अद्भूत रंग त्याला जांभळाच्या झाडांमध्ये सहज मिसळून जाण्यास मदत करतो. जुलै २०१५ मध्ये आंबोलीतील पावसाचे पाणी साचलेल्या झाडांच्या ढोलीत हा खेकडा पहिल्यांदा निदर्शनास आला होता. त्यानंतर गोव्यातील हॅथीपाल येथील जमिनीलगतच्या झाडांच्या ढोलीत आणि खडकांखालीही या खेकड्यांचे अस्तित्व आढळून आले आहे.
या खेकड्याला शास्त्रीयदृष्ट्या 'अॅट्रोपुर्प्युरिया' हे नाव लॅटिन भाषेतील 'डार्क पर्पल' म्हणजेच गडद जांभळा या शब्दावरून मिळाले आहे. इतर प्रजातींपेक्षा याचा गडद जांभळा आणि रुंद पाठीचा भाग याला वेगळी ओळख मिळवून देतो. वैज्ञानिक शोधापूर्वीही स्थानिक रहिवाशांना या खेकड्याबद्दल माहिती होती. रस्त्यावर वाहनांच्या धडकेने अपघाती मरण पावणारे गोम किंवा साप खाताना स्थानिकांनी या खेकड्याला अनेकदा पाहिले आहे.
या प्रजातीची शारीरिक रचना रंजक आहे. याच्या नांग्यांचा आकार असमान असतो; म्हणजेच एक नांगी मोठी तर दुसरी लहान असते. मोठ्या नांगीच्या बोटांवर चार ते पाच मोठे दात असतात. दोन्ही बोटे जुळतात तेव्हा त्यांच्यामध्ये एक पोकळी किंवा जागा उरते. अन्न पकडण्यासाठी, स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि मादीला आकर्षित करण्यासाठी किंवा प्रतिस्पर्ध्याशी लढण्यासाठी या नांग्यांचा वापर होतो.
निसर्गाच्या साखळीतील हा एक महत्त्वाचा घटक असून, पश्चिम घाटातील अशा जैवविविधतेचे जतन करणे ही काळाची गरज बनली आहे.