Home >> गोवा >> विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात लढा सुरूच ठेवण्याचा काँग्रेसचा निर्धार

विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात लढा सुरूच ठेवण्याचा काँग्रेसचा निर्धार

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात लढा सुरूच ठेवण्याचा काँग्रेसचा निर्धार

पणजी : विद्यार्थ्यांचे न्याय्य हक्क आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधातील काँग्रेसचा लढा असाच सुरूच राहणार असल्याचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी स्पष्ट केले आहे. आता हे आंदोलन अधिक तीव्र करत तालुका तसेच जिल्हा पातळीवर निदर्शने करण्यात येणार आहेत.

परीक्षा घोटाळ्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांवर व युवकांवर पोलिसांचा वापर करून दडपशाही करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला. लोकशाही मार्गाने न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना धमकावून, ताब्यात घेऊन किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबता येणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

ते पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांचा लोकशाही मार्गाने व्यक्त होणारा आवाज दडपण्याचा भाजपचा प्रत्येक प्रयत्न आमचा निर्धार अधिक दृढ करणारा ठरत आहे. परीक्षा व्यवस्थेत सातत्याने होणाऱ्या घोटाळ्यांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून, गोवा काँग्रेस प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आम्ही कोणत्याही दडपशाहीला घाबरणार नाही आणि या लढ्यातून मागे हटणार नाही.”

जनसंपर्क मोहिमा, सोशल मीडियावरील प्रचार आणि खोट्या आश्वासनांच्या जोरावर भाजप सरकार अनेक वर्षांचे परीक्षा घोटाळे लपवू शकत नाही किंवा आपली जबाबदारी टाळू शकत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

राज्यभरात आंदोलन अधिक व्यापक करण्याची घोषणा करताना, काँग्रेस हे आंदोलन राज्यातील प्रत्येक जिल्हा, प्रत्येक मतदारसंघ आणि प्रत्येक ब्लॉकपर्यंत घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले; जेणेकरून विद्यार्थ्यांचा आवाज राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल.

खालील मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशारा काँग्रेसने दिला आहे:

* केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी परीक्षा घोटाळ्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा.

* परीक्षा घोटाळ्यांविषयी तसेच परीक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर संसदेत सविस्तर चर्चा व्हावी.

* विद्यार्थी आणि युवकांनी लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनादरम्यान त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत.

हेही वाचा
सर्व पहा