Home >> गोवा >> मुख्याधिकाऱ्यांची बदली होताच म्हापशात दुकानदारांकडून भाडेवसुली

मुख्याधिकाऱ्यांची बदली होताच म्हापशात दुकानदारांकडून भाडेवसुली

चार महिन्यांपासून वसुली होती बंद : व्यापाऱ्यांनीच केली होती​ वसुलीची मागणी

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
6 mins ago
मुख्याधिकाऱ्यांची बदली होताच म्हापशात दुकानदारांकडून भाडेवसुली

म्हापसा : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सूचनेनुसार, म्हापसा नगरपालिकेने बाजारपेठेतील दुकाने आणि स्टॉलधारकांकडून भाडे वसुली पुन्हा सुरू केली आहे. गेल्या चार महिन्यांपासून पालिकेने ही कर वसुली बंद केली होती. व्यापाऱ्यांनी ही भाडे वसुली पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती आणि त्यांना तसे आश्वासनही देण्यात आले होते. अखेरीस मुख्याधिकारी बदलताच पालिकेकडून आता ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे.

हल्लीच म्हापसा शहरातील भेटीवेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेऊन मार्केटमधील भाडे वसुली पुन्हा सुरू करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. भाडे वसुली अशीच अजून काही महिने बंद राहिल्यास नंतर एकाचवेळी हा कर भरण्यास व्यापारी वर्गाला जड जाईल. त्यामुळे हा कर घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली होती. व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना भाडे वसुलीची प्रक्रिया मार्गी लावण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार, नगरपालिकेने बाजारपेठेतील दुकाने आणि स्टॉलधारकांकडून भाडे वसुली सुरू केली. म्हापसा व्यापारी असोसिएशनचे सचिव सिद्धेश राऊत म्हणाले, नगरपालिकेकडून दुकाने आणि स्टॉलधारकांचे भाडे घेणे थांबवण्यात आले होते. आता मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सोमवारपासून ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे सर्व व्यापारी कार्यालयीन वेळेत त्यांचे थकीत भाडे भरू शकतात.

नगरपालिका विद्यमान दरानेच भाडे आकारणार आहे, ज्यामध्ये केवळ वार्षिक ५ टक्के वाढ लागू असेल. तसेच एप्रिल ते जून या कालावधीसाठी कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. याव्यतिरिक्त, लवकरच ऑनलाइन भाडे भरण्याची सुविधाही सुरू केली जाईल.

भाडे वसुली प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी हस्तक्षेप आणि सहकार्य केल्याबद्दल म्हापसा व्यापारी संघटनेतर्फे सिद्धेश राऊत यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार जोशुआ डिसोझा, पालिका प्रशासक फिओना कार्दोज व मुख्याधिकारी कौशिक देसाई यांचे आभार मानले.

भाडे भरण्यापूर्वी शहानिशा करा : सिद्धेश राऊत

म्हापसा नगरपालिकेने सुमारे ७० भाडेकरूंच्या भाड्यात वाढ केली होती आणि त्या प्रकरणांमध्ये सध्या सुधारणा केली जात आहे. भाडे अपेक्षेपेक्षा जास्त वाटत असेल, तर व्यापाऱ्यांनी पैसे भरण्यापूर्वी त्या रकमेची शहानिशा करून घ्यावी, असे आवाहन राऊत यांनी व्यापारी वर्गाकडे केले आहे.