Home >> गोवा >> जांबावलीतील ध्यान फाऊंडेशनची गोशाळा मध्यरात्री जमीनदोस्त

जांबावलीतील ध्यान फाऊंडेशनची गोशाळा मध्यरात्री जमीनदोस्त

१५० हून अधिक जणांवर केपे पोलिसांत गुन्हा दाख‌ल

Story: वेब डेस्क | गोवन वार्ता |
43 mins ago
जांबावलीतील ध्यान फाऊंडेशनची गोशाळा मध्यरात्री जमीनदोस्त

केपे : दक्षिण गोव्यातील केपे तालुक्यातील देउसा-जांबावली येथे ध्यान फाऊंडेशनतर्फे चालवली जाणारी गोशाळा मंगळवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींकडून उद्ध्वस्त करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी श्री दामोदर संस्थान जांबावलीचे अध्यक्ष मंजुनाथ दुकळे आणि प्रवास नाईक यांच्यासह सुमारे १५० हून अधिक जणांविरोधात केपे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे संस्था आणि देवस्थान समिती यांच्यातील जुना वाद आता उघड चौकशीच्या भोवऱ्यात सापडला आहे.


फाऊंडेशनने दिलेल्या तक्रारीनुसार, मध्यरात्री सुमारे १२.५५ च्या सुमारास १५० हून अधिक लोकांनी आवारात बेकायदेशीर प्रवेश केला. तेथील पर्यवेक्षक आणि रखवालदाराला सुमारे दोन तास डांबून ठेवण्यात आले, तसंच घटनेचे चित्रीकरण रोखण्यासाठी त्यांचे मोबाईल फोडण्यात आले आणि सीसीटीव्ही कॅमेरे निकामी करून दोन जेसीबीच्या साहाय्याने गोशाळेचे आठ शेड पाडण्यात आले. या गोशाळेत सुमारे ३०० गोवंश, लहान वासरे आणि आजारी गायी होत्या. मुसळधार पावसात ही जनावरे उघड्यावर आल्याने अनेक गायी भीतीपोटी लगतच्या जंगलात पळून गेल्या, काही जखमी झाल्या तर काहींचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

देवस्थान समितीने फेब्रुवारी महिन्यात गोशाळेसाठी संमतीपत्र दिले होते आणि त्याच आधारे सुमारे १.५ कोटी रुपये खर्चून हे शेड उभारण्यात आले होते, असा दावा ध्यान फाऊंडेशनच्या समन्वयक अर्चना चौबे यांनी केला आहे. मात्र, ही जागा एका अध्यात्मिक संस्थेच्या शैक्षणिक प्रकल्पासाठी राखीव असल्याने आणि आजूबाजूच्या रहिवाशांच्या तक्रारींमुळे ती खाली करण्यास सांगण्यात आले होते, असे सांगत देवस्थानचे अध्यक्ष मंजुनाथ दुकळे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या तोडफोडीशी आपला काहीही संबंध नसून आपले नाव नाहक यात ओढले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

केपे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. मुसळधार पावसात निष्पाप जनावरांचे झालेले हाल आणि कोट्यवधींच्या नुकसानामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.