पुढील ४८ तासांत कमाल तापमान ३१°C आणि किमान २५°C राहील.

पणजी : गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर काल राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाने पुनरागमन केले आहे. गेल्या २४ तासांत झालेल्या जोरदार पावसामुळे मान्सूनचा तुटवडा काही प्रमाणात भरून निघण्यास मदत झाली असली, तरी हवेतील दमटपणा आणि उकाड्यामुळे नागरिक अद्यापही त्रस्त आहेत. आज सकाळपासून दुपारपर्यंत पावसाने उसंत घेतली होती.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात सरासरी १.८२ इंच पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये केपे तालुक्यात सर्वाधिक ४.३५ इंच पाऊस झाला. १ जून ते २३ जुलै या कालावधीत राज्यात सरासरी ४३.७४ इंच पावसाची नोंद झाली असून, मोसमी पावसातील एकूण तुटवडा घटून ३६.२ टक्क्यांवर आला आहे.
पाऊस होऊनही हवेतील आर्द्रतेमुळे उकाडा कायम असून कमाल तापमान ३१.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सरासरीपेक्षा २.४ अंश सेल्सिअसने जास्त आहे. पुढील २४ तासांत पणजी आणि मुरगाव येथे साधारणपणे ढगाळ हवामान राहील असून मध्यम पावसाचा अंदाज आहे. या काळात कमाल तापमान ३०°C तर किमान तापमान २४°C राहण्याची शक्यता आहे. तसेच, पुढील ४८ तासांतही ढगाळ हवामानासह मध्यम पाऊस पडेल, ज्या दरम्यान कमाल तापमान ३१°C आणि किमान तापमान २५°C च्या आसपास राहील.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आज, २३ जुलै ते २५ जुलैपर्यंत राज्यासाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. या काळात काही ठिकाणी मुसळधार पावसासह ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.