Home >> देश -परदेश >> २६ दिवसांनंतर सोनम वांगचुकने उपोषण सोडले

२६ दिवसांनंतर सोनम वांगचुकने उपोषण सोडले

सीजेपीचे आंदोलन सुरूच

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
6 hours ago
२६ दिवसांनंतर सोनम वांगचुकने उपोषण सोडले

नवी दिल्ली : पर्यावरण तथा समाज कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तब्बल २६ दिवसांचे बेमुदत उपोषण केंद्र सरकारकडून मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर गुरुवारी मध्यरात्री मागे घेतले. मात्र, कॉकरोच जनता पार्टीने (CJP)  शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवरील आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी वांगचुक यांची भेट घेतली.  सरकारने शांततापूर्ण आंदोलनात सहभागी झालेल्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे तसेच शिक्षण क्षेत्रातील सुधारणांवर आणि परीक्षा गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर वांगचुक यांनी उपोषण सोडले.

देशात कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ नये : वांगचुक

उपोषण समाप्त केल्यानंतर वांगचुक यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, "सरकारकडून मिळालेल्या आश्वासनांनंतर मी अखेर २६ दिवसांचे उपोषण सोडत आहे. देशात कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ नये, यासाठी सर्वांनी सतर्क राहावे," असे आवाहन केले.

वांगचुक यांनी आरोग्याची काळजी घ्यावी : पंतप्रधान

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आरोग्याची काळजी घ्यावी आणि लवकर बरे व्हावे, अशी शुभेच्छा दिली

आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सकारात्मक : नड्डा

केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी सांगितले की, २० जुलैच्या 'संसद चलो' आंदोलनात सहभागी झालेल्या शांततापूर्ण आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. तसेच, प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांवर संसदेत चर्चा आणि परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यास सरकार तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना योग्य भरपाई देण्याचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

आंदोलनक सुरूच राहील : दिपके

दरम्यान, सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी वांगचुक यांचे कौतुक करत, "वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले असले तरी आमचे आंदोलन सुरूच राहील. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत आम्ही माघार घेणार नाही," असे स्पष्ट केले.

वांगचुक यांनी २८ जूनपासून जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभाग घेत बेमुदत उपोषण सुरू केले होते. स्पर्धा परीक्षांतील कथित गैरव्यवहार, परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा, तसेच शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले होते. उपोषणादरम्यान त्यांचे सुमारे ११ किलो वजन घटले होते.

प्रकृती खालावल्याने दिल्ली पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे त्यांची गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात भरती करण्यात आली. तेथे उपचार सुरू असताना त्यांनी उपोषण कायम ठेवले होते. केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर अखेर त्यांनी २६ दिवसांनी उपोषण मागे घेतले. 

हेही वाचा
सर्व पहा