Home >> गोवा >> मराठी राजभाषा केली, तर भाजपचे ३० आमदार निवडून आणू!

मराठी राजभाषा केली, तर भाजपचे ३० आमदार निवडून आणू!

सुभाष वेलिंगकर : मराठीला डावलल्यास भाजपला परिणाम भोगावे लागतील

Story: गोवन वार्ता। न्यूज डेस्क |
23rd July, 08:27 pm
मराठी राजभाषा केली, तर भाजपचे ३० आमदार निवडून आणू!

पणजी : विधानसभेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात राजभाषा कायद्यात आवश्यक ती दुरुस्ती करून कोकणीबरोबरच मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यासाठीची तयारी भाजपच्या सरकारने करावी, ही गोमंतकीयांची मागणी आहे. हे घडले तर भाजपचे ३० आमदार निवडून आणू, जनतेला याच अधिवेशनात निकाल हवा आहे, असे सुभाष वेलिंगकर यांनी सांगितले.

मराठी राजभाषा मागणीच्या जनाधाराचा पाया अधिक विस्तृत व बळकट करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या ‘मराठी सद्भावना मिलन’ या मराठी राजभाषा निर्धार समितीच्या फोंडा प्रखंडाच्या विश्व हिंदू परिषद सभागृह, खडपाबांध फोंडा येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रमुख मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर यांनीही मार्गदर्शन केले.

यावेळी व्यासपीठावर डॉ. दत्ताराम देसाई, डॉ.  प्रा. अनिता तिळवे, डॉ. नूतन देव, उद्योजक देविदास सराफ, आर्किटेक्ट कमलाकर साधले, समाज कार्यकर्ते जयंत मिरिंगकर आणि डॉ. शिरीष बोरकर उपस्थित होते.

सुभाष वेलिंगकर म्हणाले की, मराठी राजभाषा- मागणीसाठीच्या चळवळीला ४० वर्षांचा इतिहास आहे. भाजप सरकारने पुन्हा मराठीशी प्रतारणा केली तर मराठीप्रेमींची व्होटबँक २०१७ ची पुनरावृत्ती करील आणि त्याला पूर्णपणे जबाबदार भाजप सरकारच राहील, असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी फोंडा प्रखंड ‘मराठी सद्भावना मिलन’चे निमंत्रक- संयोजक जयंत मिरिंगकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

गो. रा. ढवळीकर यांनी प्रस्तावनेत गेल्या सव्वा वर्षातील मराठी राजभाषा निर्धार समितीच्या राजभाषा आंदोलनाच्या वाटचालीची माहिती दिली. मंत्री व राजकीय नेत्यांच्या, शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटींची माहिती दिली आणि चर्चेला सुरुवात केली.

चर्चेत डॉ. दत्ताराम देसाई, पर्यावरण तज्ज्ञ कमलाकर साधले, माजी शिक्षण उपसंचालक कालिदास मराठे, लेखिका दीपा मिरिंगकर, पतंजलीचे गोव्यातील माजी प्रमुख डॉ. सूरज काणेकर आदींनी सहभाग घेऊन विचार मांडले.

फोंडा प्रखंडांतील ६० पेक्षा जास्त मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये माजी आमदार मोहन आमशेकर, लेखक डॉ. बिभीषण सातपुते, हिंदू जनजागृती समितीचे सत्यविजय नाईक, चित्रकार किर्तीकुमार प्रभू, सहकार क्षेत्रातील जयवंत आडपैकर, शिक्षणतज्ज्ञ गोविंद देव, डॉ. सुभाष शिकेरकर, राष्ट्र सेविका समितीच्या प्रांत कार्यकर्त्या विभावरी उमर्ये, उद्योजक व विद्यानिधी शिक्षण संकुलाचे प्रमुख उदय डांगी, डॉ. राजेंद्र देव, आर्किटेक्ट व विश्व हिंदू परिषदेचे दक्षिण गोवा संपर्क प्रमुख मच्छिंद्र च्यारी, लेखिका लक्ष्मी जोग, लेखिका माधुरी शेणवी उसगावकर, सरपंच व समाजकार्यकर्ते मोहन वेरेकर, कीर्तनकार संघटनेचे प्रमुख सुहासबुवा वझे, उद्योजक उदय डांगी, डॉ. राजेंद्र देव आदिंची उपस्थिती होती.

डॉ. प्रा. अनिता तिळवे यांनी आभार मानले.


हेही वाचा
सर्व पहा