मुख्यमंत्र्यांकडून अभिषेक : आषाढी एकादशीनिमित्त हजारो वारकऱ्यांची पायी वारी

साखळी : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलापूर-साखळी येथे हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. ‘जय जय पांडुरंग हरी’, ‘जय जय रामकृष्ण हरी’, ‘जय हरी विठ्ठल’ या नामघोषांनी मंदिर परिसर आणि संपूर्ण विठ्ठलापूर दुमदुमून गेला. गोव्याच्या विविध भागांतून पायी चालत आलेल्या वारकऱ्यांनी विठ्ठल-रखुमाईच्या चरणी सेवा अर्पण केली.
पहाटे साडेतीन वा. देवस्थानचे महाजन तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी श्री विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तींवर प्रथम स्वहस्ते अभिषेक करून मुक्तद्वार अभिषेकाला प्रारंभ केला. त्यानंतर दिवसभर भाविकांनी मोठ्या संख्येने स्वहस्ते अभिषेक करत धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कन्या पार्थिवीसह मंदिरात उपस्थित राहून श्री विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तींवर स्वहस्ते अभिषेक केला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार प्रेमेंद्र शेट, पर्यटनमंत्री रोहन खंवटे तसेच केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनीही दर्शन घेऊन अभिषेक केला.
आषाढी एकादशीनिमित्त साखळी व परिसरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनीही पायी दिंडी काढत वारकरी परंपरेचा उत्साह अनुभवला. विद्यार्थ्यांनी विठ्ठलनामाचा गजर, रिंगण आणि विविध भक्तिमय उपक्रम सादर करत उपस्थितांची मने जिंकली. लहान वयापासूनच वारकरी परंपरेचे संस्कार रुजावेत, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे शिक्षिका श्वेता पुजारी यांनी सांगितले.
गोव्याच्या विविध भागांतून आलेल्या वारकऱ्यांच्या सहभागामुळे विठ्ठलापूर-साखळी येथे आषाढी एकादशीचा सोहळा भक्ती, समता आणि संस्कृतीचा उत्सव ठरला. विठ्ठलनामाच्या अखंड गजरात परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आणि प्रति पंढरपूरची ओळख पुन्हा अधोरेखित झाली.
गोव्यात आध्यात्मिक संस्कृती रुजत आहे : मुख्यमंत्री
गोव्यात अलीकडच्या काळात आध्यात्मिक संस्कृती अधिक बळकट होत असून युवा पिढीही मोठ्या संख्येने वारीत सहभागी होत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, युवकांना सुसंस्कार लाभावेत आणि देशाच्या विकासात त्यांचे योगदान वाढावे, अशी प्रार्थना आपण श्री विठ्ठल-रखुमाईच्या चरणी केल्याचे त्यांनी नमूद केले.