सुमारे ६० लाखांचा खर्च अपेक्षित

पणजी : गोव्यात ‘पीएम श्री’ शाळा म्हणून मान्यता मिळालेल्या १६ सरकारी शाळांमध्ये सौरऊर्जा प्रणाली बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोवा ऊर्जा विकास मंडळ (गेडा) यांच्या विशेष प्रकल्पांतर्गत या शाळांमध्ये ग्रिड-कनेक्टेड सोलर पॅनल ऊर्जा व्यवस्था उभारण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे ६० लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
गेडाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी १६ शाळांमध्ये प्रत्येकी ५ किलोवॅट पीक क्षमतेची ग्रिड-कनेक्टेड सोलर पीव्ही ऊर्जा व्यवस्था उभारण्यासाठी डिझाइन, पुरवठा, बसविणे, चाचणी आणि कार्यान्वयनासाठी निविदा जारी केल्या आहेत. या प्रकल्पाची एकूण सौरऊर्जा निर्मिती क्षमता ८० किलोवॅट असेल.
या निविदेमध्ये सौरऊर्जा व्यवस्थेची पाच वर्षे देखभाल आणि संचालन यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे बसविण्यात येणाऱ्या यंत्रणा सातत्याने कार्यरत राहतील आणि त्यांची योग्य देखभाल केली जाईल.
या प्रकल्पासाठी जीएसटी वगळता ६०,७९,६४८ इतका खर्च अपेक्षित असून, प्रत्येक शाळेसाठी सौरऊर्जा प्रणाली उभारण्याचा अंदाजे खर्च ३,७९,९७८ इतका असेल.
या उपक्रमामुळे सरकारी शाळांचे पारंपरिक वीजेवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. तसेच नवीकरणीय ऊर्जेच्या वापराला चालना मिळून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेबाबत जागरूकता निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यातील सर्व १६ ‘पीएम श्री’ शाळांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यामुळे सरकारी शिक्षण संस्थांमध्ये पर्यावरणपूरक आणि शाश्वत पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जाणार आहे.