Home >> गोवा >> मडगाव कोमुनिदादचे जुने घोटाळे बाहेर येण्याच्या भीतीपोटीच मला विरोध: पॅट्रीसिओ कुतिन्हो

मडगाव कोमुनिदादचे जुने घोटाळे बाहेर येण्याच्या भीतीपोटीच मला विरोध: पॅट्रीसिओ कुतिन्हो

डगाव कोमुनिदाद अध्यक्ष पॅट्रीसिओ कुतिन्हो यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले. जमिनीची चुकीची नोंद आणि ५ लाखांच्या सीसीटीव्ही खर्चावर प्रश्न उपस्थित केले. वाचा सविस्तर.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
7 mins ago
मडगाव कोमुनिदादचे जुने घोटाळे बाहेर येण्याच्या भीतीपोटीच मला विरोध: पॅट्रीसिओ कुतिन्हो

मडगाव: 'माझे घर' योजनेत सरकारला मदत करण्यासाठी आपली निवड झाल्याचा करण्यात आलेला आरोप पूर्णपणे खोटा आणि बिनबुडाचा आहे. अशा कोणत्याही प्रकरणात अध्यक्ष एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही, त्यासाठी स्वतंत्र समितीची निवड केलेली असते. याशिवाय टेनंट संदर्भातील प्रकरणांमध्ये अ‍ॅटर्नी अथवा वकिलांची उपस्थिती अनिवार्य असते. केवळ कोमुनिदादमधील जुने गैरव्यवहार आणि घोटाळे उघडकीस येतील, या भीतीनेच काही घटकांकडून मला विरोध केला जात आहे, असा घणाघाती दावा मडगाव कोमुनिदादचे अध्यक्ष पॅट्रीसिओ कुतिन्हो यांनी केला आहे.

मडगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना कुतिन्हो यांनी शनिवारी झालेल्या बैठकीतील सर्व आरोप फेटाळून लावले. पूर्वीचे निर्वाचित अध्यक्ष सावियो कुरैया यांनी राजीनामा दिल्यानंतर झालेल्या नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीवर काही सदस्यांनी आक्षेप घेतला होता. नवनियुक्त अध्यक्ष हे कोमुनिदादच्या नियमावलीनुसार आवश्यक ती पात्रता पूर्ण करत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावर स्पष्टीकरण देताना कुतिन्हो म्हणाले की, मडगाव कोमुनिदादचा अध्यक्ष या नात्याने शनिवारी आपण कोणतीही बैठक आयोजित केली नव्हती. आपण २३ जुलै रोजी अधिकृत बैठक आयोजित करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला तसेच कोमुनिदादच्या व्यवस्थापकीय समितीला आधीच रहीतसर पत्र दिले होते. या पत्रामध्ये बैठकीत चर्चा केल्या जाणाऱ्या १० महत्त्वाच्या मुद्द्यांची सविस्तर माहिती देण्यात आली होती. जर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असती तर हे सर्व प्रलंबित प्रश्न सहमतीने सुटू शकले असते.

कोमुनिदादच्या कारभारावर बोट ठेवताना ते म्हणाले की, एप्रिल महिन्यापासून समितीकडून कोणताही अर्थसंकल्प तयार करण्यात आलेला नाही. कोमुनिदादकडे अनेक ना-हरकत दाखले (NOC) प्रलंबित आहेत, तर अतिक्रमणाच्या अनेक तक्रारींवर चर्चा होणे अत्यंत गरजेचे होते. पूर्वीच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर सिलेस्टिन या केवळ एका सदस्याने पत्र पाठवून क्रुझ यांना संधी देण्याची मागणी केली होती. मात्र, व्यवस्थापकीय समितीने प्रशासकांना तसे कोणतेही अधिकृत पत्र दिलेले नव्हते. आपली नियुक्ती ही सरकारकडून प्रस्तावित करण्यात आलेली आहे आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी असणाऱ्या अटी या नियुक्तीला लागू होत नाहीत. कुतिन्हो यांनी स्पष्ट केले की, आपल्याकडे कोमुनिदादचे शेअर्स असून आपणही वैध भागधारक आहोत. हे शेअर्स कधी घेतले, याचा या निवडीवर कोणताही परिणाम होत नाही. जर आपण काही चुकीचे करत असू तर विरोधकांनी ते सिद्ध करून दाखवावे, आपण व्यवस्थापकीय समितीसोबत काम करण्यास सदैव तयार आहोत, असेही ते म्हणाले.

कोमुनिदादमधील गैरव्यवहारांकडे लक्ष वेधताना कुतिन्हो यांनी सांगितले की, ओल्ड मार्केट नजीक असलेल्या कोमुनिदादच्या जागेवर 'अकबर ए तमानी' नावाच्या व्यक्तीची नोंद आढळली आहे. ही नोंद कोणत्या आधारे करण्यात आली आणि ही व्यक्ती नेमकी कोण, याची सत्यता सदस्यांसमोर येणे गरजेचे आहे. ही नोंद २०२१ मध्ये करण्यात आली असून हा घोटाळा बाहेर पडेल याच भीतीने काहींचा आपल्याला विरोध आहे. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील जागेचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोमुनिदाद समितीने काही जमिनींबाबत न्यायालयात न्यायालयीन लढा दिला, मात्र अंतिम निकाल लागण्यापूर्वीच अर्ज मागे घेण्यात आले. यामुळे समितीचे लाखो रुपये वाया गेले असून या प्रकाराची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच, सुरक्षा व्यवस्थेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या नावाखाली ५ लाख रुपयांचा खर्च दाखवण्यात आला आहे. हा अफाट खर्च नेमका कुठे आणि कसा झाला, याची खरी माहिती सर्व भागधारकांना मिळणे आवश्यक आहे, असे कुतिन्हो यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा
सर्व पहा