सीबीआय असल्याचे भासवून महिलेची ६४ लाखांची सायबर फसवणूक

आसाममधील एकाला अटक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
51 mins ago
सीबीआय असल्याचे भासवून महिलेची ६४ लाखांची सायबर फसवणूक

पणजी : सीबीआय आणि मुंबईचा पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून दक्षिण गोव्यातील (South Goa) कासावली येथील एका महिलेची डिजिटल अरेस्टद्वारे (Digital Arrest) ६४ लाखांची सायबर फसवणूक करण्यात आली.  महिलेला ‘मनी लॉन्डरिंग’ प्रकरणात ‘अटक वॉरंट’ असल्याची भीती दाखवत ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सायबर गुन्हे हाताळणाऱ्या पोलिसांनी आसाममधील एका संशयिताला अटक केली आहे.

सायबर गुन्हे पोलीस ठाण्यात (Cyber crime Police station, Goa) भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३१९(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६-डी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आणि देवजित दास (रा.  होजाई-दोबोका, आसाम) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासावली येथील रहिवासी  महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, २७ नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत विविध मोबाईल क्रमांकांवरून संपर्क साधणाऱ्या संशयिताने स्वतःला सीबीआय आणि मुंबई पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले. तक्रारदार महिलेविरुद्ध मनी लॉन्डरिंग प्रकरणात अटक वॉरंट जारी झाल्याचे सांगून तिला व्हिडिओ कॉलवर सतत देखरेखीखाली असल्याची भीती दाखविण्यात आली.

यानंतर कथित प्रकरण मिटवून देण्याच्या बहाण्याने संशयिताने तक्रारदार महिलेकडून दोन वेगवेगळ्या आरटीजीएस व्यवहारांद्वारे एकूण ६४ लाख रुपये ॲक्सिस बँकेतील दोन खात्यांमध्ये जमा करून घेतले. अशा प्रकारे संगणकीय माध्यमांचा वापर करून बनावट ओळख निर्माण करत संशयिताने महिलेची फसवणूक केली. सायबर फसवणूक रॅकेटमधील इतर संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा
सर्व पहा