गोव्यात वॉटर मेट्रोसाठी अनुकूल वातावरण; चार महिन्यांत डीपीआर तयार होणार

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
45 mins ago
गोव्यात वॉटर मेट्रोसाठी अनुकूल वातावरण; चार महिन्यांत डीपीआर तयार होणार

पणजी : गोव्यात वॉटर मेट्रो प्रकल्प (Wate Metro Project in Goa)  राबविण्यासाठी योग्य वातावरण असून, या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) येत्या चार महिन्यांत तयार केला जाणार असल्याची माहिती कोची मेट्रो रेल लिमिटेडचे सरव्यवस्थापक लोकनाथ बेहरा यांनी दिली. प्रकल्पासाठी वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक बोटी पर्यावरणपूरक तसेच प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सक्षम असतील. या बोटींच्या बांधणीसाठी गोवा शिपयार्डसोबत प्राथमिक स्तरावर बोलणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

गोव्यात वॉटर मेट्रो प्रकल्पाच्या शक्यतांचा अभ्यास सुरू आहे.  प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत सुविधांसह इलेक्ट्रिक बोटींची निर्मिती आणि संचालन याबाबत नियोजन केले जात आहे. पर्यावरणाचा समतोल राखत जलवाहतूक व्यवस्था विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.

प्रकल्पाबाबत गैरसमज करून घेट नयेत : मंत्री फळदेसाई

दरम्यान, वॉटर मेट्रो प्रकल्पाबाबत नागरिकांनी कोणतेही गैरसमज करून घेऊ नयेत, असे आवाहन नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले. प्रस्तावित टर्मिनल्समुळे परिसरातील स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा दावा त्यांनी केला.

वॉटर मेट्रोच्या बोटींच्या वाहतुकीमुळे स्थानिक मच्छीमारांच्या व्यवसायावर तसेच पर्यावरणावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे फळदेसाई यांनी स्पष्ट केले. त्यामुळे स्थानिकांच्या हिताला बाधा न आणता गोव्यातील जलवाहतूक अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा