वारसाहक्काच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी; बनावट दस्तऐवजांचा वापर केल्याचा आरोप

पणजी : केपे तालुक्यातील बाळ्ळी-अडणे येथील जमीन व्यवहारात दिशाभूल करून सुमारे ₹५५.७८ लाखांची कथित फसवणूक केल्याप्रकरणी केपे पोलिसांनी मन्सूर शेख आणि अन्य अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देऊळवाडा-बाळ्ळी येथील सूरज बाळ्ळीकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार, ११ ऑक्टोबर २०२१ ते ४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत संशयितांनी बाळ्ळीतील अडणे परिसरातील स्थावर मालमत्तेचा व्यवहार करताना संबंधित मालमत्तेचा हक्क स्पष्ट आहे. सर्व वारसाहक्काच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगून तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.
त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने ₹५०,४७,५०० तर त्यांच्या बहिणीने ₹५,३१,०८४ इतकी रक्कम संबंधित व्यवहारात गुंतवली.
मात्र, नंतर तपासणी दरम्यान २७ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या वारसाहक्काच्या दस्तऐवजात काही कायदेशीर वारसांचा समावेश नसल्याचे निदर्शनास आल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. तसेच, रिलीज डीड, असाइनमेंट डीड, ‘पॉवर ऑफ अॅटर्नी’ तसेच इतर मालकी हक्काशी संबंधित काही संशयास्पद व कथित बनावट कागदपत्रांचा वापर विशेष दिवाणी खटल्यात करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, संशयितांनी या कागदपत्रांच्या प्रती व्हॉट्सअॅपद्वारे पाठवल्या. मात्र मूळ कागदपत्रे दाखविण्यास नकार दिला. तसेच महत्त्वाची माहिती लपवून ठेवत तक्रारदाराची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी केपे पोलिसांनी (Quepem Police station) मन्सूर शेख व इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणुकीसह संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. उपनिरीक्षक दीपा देईकर पुढील तपास करत आहेत.