आरजीपी पक्षाच्या ताब्यावरून आमदार बोरकर- खोलकर यांच्यात संघर्ष

आरजीपीचे खरे दावेदार आपणच असल्याचा दोन्ही गटांचा दावा

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
28th July, 11:43 pm
आरजीपी पक्षाच्या ताब्यावरून आमदार बोरकर- खोलकर यांच्यात संघर्ष

पणजी : रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षावर (आरजीपी) अधिकृत ताबा मिळवण्यावरून वीरेश बोरकर आणि अजय खोलकर यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. खोलकर गटाने बोरकर यांना पक्षातून बडतर्फ केल्यानंतर बोरकर यांनी राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने शिस्तभंग समितीमार्फत अजय खोलकर आणि विश्वेश नाईक यांच्यावर कारवाई केली. त्यानंतर पक्षातील वाद आणखी चिघळला आहे.

सध्या पक्षाच्या घटनेनुसार वीरेश बोरकर हे आरजीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष असून पक्षाची धुरा त्यांच्या हातात आहे. मात्र, अजय खोलकर यांचा दावा आहे की, ही घटना चुकीची असून पक्षाचा खरा ताबा त्यांच्या गटाकडे आहे. बोरकर यांनी पक्षाचे खजिनदार अजय खोलकर आणि सरचिटणीस विश्वेश नाईक यांना राष्ट्रीय अध्यक्षांच्या अधिकाराने निलंबित केल्यानंतर, प्रत्युत्तरादाखल विश्वेश नाईक यांनी सरचिटणीस पदाचा वापर करत बोरकर यांना पक्षातून बडतर्फ केल्याचे जाहीर केले.

मात्र, खोलकर, नाईक आणि आमदार वीरेश बोरकर हे तिघेही एकमेकांचे आदेश अमान्य करत आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आरजीपीचे खरे दावेदार आपणच असल्याचा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे.

दरम्यान, मंगळवारी बोरकर यांनी शिस्तभंग समिती स्थापन केल्यानंतर पक्षातील समीकरणे बदलली. राष्ट्रीय अध्यक्षांच्या अधिकाराचा वापर करत आरजीपीने ‘शिस्तपालन समिती’ स्थापन केली असून, प्रवीण हळर्णकर यांची अध्यक्षपदी तर नीतेश भंडारी आणि केविन ए. कोरिया यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गैरवर्तन, शिस्तभंग, पक्षविरोधी कारवाया तसेच पक्षाची घटना आणि आचारसंहितेचे उल्लंघन यासारख्या प्रकरणांची चौकशी करण्याची जबाबदारी या समितीकडे देण्यात आली आहे.

बोरकर यांनी निलंबित विश्वेश नाईक यांना समितीसमोर बाजू मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आणि आपली बाजू मांडण्यासाठी त्यांनी स्वतः किंवा अधिकृत वकील अथवा प्रतिनिधीमार्फत सुनावणीला उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच अजय खोलकर आणि विश्वेश नाईक हे निलंबित सदस्य असल्याने पक्षाच्या वतीने अधिकृत वक्तव्य करण्यास त्यांना बंदी घालण्यात आल्याची नोटीसही जारी करण्यात आली आहे.

विश्वेश नाईक यांचा आरजीपीला रामराम

शिस्तपालन समितीने नोटीस बजावल्यानंतर काही तासांतच विश्वेश नाईक यांनी आरजीपीला रामराम केला. पक्षातील सध्याची परिस्थिती, अंतर्गत मतभेद आणि घडामोडींमुळे आपण दुखावलो असून या परिस्थितीत आपली जबाबदारी पार पाडणे शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले. त्यानंतर विश्वेश नाईक यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह संस्थापक सदस्य पदाचा राजीनामा दिला.

हेही वाचा
सर्व पहा