देशभरात सायबर फसवणुकीत चार वर्षांत तिपटीने वाढ

२०२४ मध्ये देशभरात २९,७५८ गुन्हे; केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
9 mins ago
देशभरात सायबर फसवणुकीत चार वर्षांत तिपटीने वाढ

नवी दिल्ली : देशातील सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये गेल्या चार वर्षांत चिंताजनक वाढ झाली आहे.  २०२०च्या तुलनेत २०२४ मध्ये अशा गुन्ह्यांची संख्या जवळपास तिपटीने वाढल्याची माहिती केंद्र सरकारने राज्यसभेत दिली. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या (NCRB) आकडेवारीनुसार, २०२० मध्ये देशभरात १०,३९५ सायबर फसवणुकीचे गुन्हे नोंदवले गेले होते. ही संख्या २०२४ मध्ये वाढून २९,७५८ वर पोहोचली आहे.

केंद्रीय गृह राज्यमंत्री बंडी संजय कुमार यांनी राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, २०२१ मध्ये १४,००७ प्रकरणे नोंदवली गेली होती आणि त्यानंतर सायबर गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

राज्यानुसार पाहता, २०२४ मध्ये तेलंगणा येथे सर्वाधिक १८,९२२ सायबर फसवणुकीची प्रकरणे नोंदवली गेली. त्यानंतर बिहारमध्ये ४,०२०, महाराष्ट्रमध्ये २, ८२७ आणि ओडिशामध्ये १,५४६ प्रकरणांची नोंद झाली.

केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले की, सायबर फसवणुकीमुळे नागरिकांचे किती आर्थिक नुकसान झाले किंवा त्यातील किती रक्कम परत मिळविण्यात आली, याची स्वतंत्र आकडेवारी राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (NCRB) ठेवत नाही.  तसेच गेमिंग अॅप्स, गुंतवणूक फसवणूक, बनावट फोन कॉल (विशिंग), ई-वॉलेट किंवा यूपीआय फसवणूक अशा प्रकारेनिहाय माहितीची स्वतंत्र नोंद आता ठेवण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र (आय४सी) (Indian Cyber Crime Coordination Centre (I4C) ) स्थापन केले आहे. विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधून सायबर गुन्ह्यांविरोधात कारवाई अधिक सक्षम करण्यात येत असल्याची माहितीही सरकारने दिली.

हेही वाचा
सर्व पहा