गोव्यातील ४० टक्क्यांहून अधिक सहकारी संस्थांना कुलूप

३ हजारांहून अधिक संस्था सक्रिय, पण त्यातील ४२ टक्के संस्था सध्या तोट्यात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th July, 12:21 am
गोव्यातील ४० टक्क्यांहून अधिक सहकारी संस्थांना कुलूप

पणजी : राज्यात ५ हजार नोंदणीकृत सहकारी संस्थांपैकी ४१ टक्के संस्था बंद पडल्या आहेत. ३ हजारांहून अधिक संस्था सक्रिय आहेत, पण त्यातील ४२ टक्के संस्था सध्या तोट्यात चालल्या आहेत, अशी आकडेवारी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी लेखी उत्तरात दिली आहे.
राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात शाह यांनी सांगितले की, ५,६११ सहकारी संस्थांपैकी ३,१६५ संस्था सक्रिय आहेत, तर २,३३७ संस्था निष्क्रिय होऊन बंद पडल्या आहेत. बंद पडलेल्या संस्थांपैकी १११ संस्था लिक्विडेशनच्या टप्प्यावर आहेत. दरम्यान, ३,१६५ सक्रिय संस्थांपैकी १,८१३ संस्था फायद्यात चालल्या आहेत, तर १,३५२ संस्था तोटा सहन करत चालल्या आहेत.
यासंदर्भात सहकार मंत्रालयाने प्राथमिक कृषी पतसंस्था, दूध आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना बहुउद्देशीय सहकारी संस्थांमध्ये बदलण्यासाठी सक्रिय पावले उचलली आहेत. व्यवसायात विविधता आणणे, आर्थिक स्थिरता मजबूत करणे आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक उपक्रमांना वाव देऊन संस्था बंद पडण्यापासून वाचवणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. सहकारी संस्थांच्या भौगोलिक विस्तारातील त्रुटी शोधण्यासाठी 'एनसीडी'चा उपयोग होतो, ज्याद्वारे नवीन बहुउद्देशीय शेतकरी पतसंस्था, दूध आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांची स्थापना करण्यास मदत मिळते. तसेच, संस्थांमध्ये निरोगी स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी 'सहकारी रँकिंग फ्रेमवर्क' तयार करण्यासाठीही याचा उपयोग होतो.

हेही वाचा
सर्व पहा