सॅम्युअल ब्रागांझा मृत्यूप्रकरणी पाेलिसांचा गोपनीय अहवाल सादर

पोलीस अधीक्षक विश्वेश कर्पे यांनी वरिष्ठांकडे सोपवला अहवाल

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
2 hours ago
सॅम्युअल ब्रागांझा मृत्यूप्रकरणी पाेलिसांचा गोपनीय अहवाल सादर

म्हापसा : गावसावाडा, म्हापसा येथील २२ वर्षीय विद्यार्थी सॅम्युअल ब्रागांझा याच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी विशेष चौकशी अधिकारी तथा पोलीस अधीक्षक विश्वेश कर्पे यांनी आपला सविस्तर गोपनीय अहवाल उत्तर गोवा पोलीस अधीक्षक हरीष मडकईकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या अहवालात म्हापसा पोलीस स्थानकातील चौकशीची क्रमवार माहिती, घटनेच्या दिवशीची परिस्थिती तसेच पोलिसांच्या भूमिकेबाबतचे निरीक्षण व निष्कर्ष समाविष्ट असल्याचे समजते.सॅम्युअल याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी संबंधितांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल केली होती. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली होती.
शवविच्छेदन अहवालात सॅम्युअलच्या डोक्यावर व डोळ्याजवळ गंभीर जखमा असल्याचे नमूद करण्यात आले होते. काही जखमा मृत्यूपूर्वी २४ तासांच्या आत झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला पोलीस ठाण्यात किंवा त्याआधी मारहाण झाली होती का, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर उच्चस्तरीय चौकशी
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर चौकशीची जबाबदारी विश्वेश कर्पे यांच्याकडे सोपवण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांनी सॅम्युअल यांच्या कुटुंबीयांसह म्हापसा पोलीस स्थानकातील अधिकारी, कर्मचारी आणि इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवले.
सॅम्युअल सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना दिसणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओच्या आधारे म्हापसा पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर झालेल्या ट्रोलिंगमुळे आणि पोलिसी कारवाईच्या भीतीमुळे सॅम्युअल मानसिक तणावाखाली गेला होता. त्यानंतर त्याने राहत्या घरी देशी कट्टा पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
निष्पक्ष चौकशीची मागणी
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी म्हापसा पोलीस स्थानकासमोर निदर्शने केली होती तसेच मेणबत्ती फेरी काढून निष्पक्ष चौकशीची मागणी केली होती. अखिल भारतीय वकील युनियन, गोवा आणि विविध सामाजिक संघटनांनीही या प्रकरणाची सखोल व पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली होती. आता गोपनीय अहवाल वरिष्ठांकडे सादर झाल्याने त्यातील निष्कर्षांच्या आधारे पुढील प्रशासकीय किंवा कायदेशीर कारवाईकडे लक्ष लागले आहे.      

हेही वाचा
सर्व पहा