दोनापावला येथील दरोडाप्रकरणी आरोपपत्र दाखल

चार बांगलादेशी दरोडेखोरांसह एका स्थानिकाचा समावेश

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
29th July, 11:26 pm
दोनापावला येथील दरोडाप्रकरणी आरोपपत्र दाखल

पणजी : दोनापावला येथील प्रसिद्ध उद्योगपतीच्या बंगल्यात पडलेल्या दरोड्या प्रकरणी गुन्हा शाखेने चार बांगलादेशी नागरिकांसह एका स्थानिक साथीदाराविरोधात पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात संशयित नूर इस्लाम उर्फ नदीम खान, मोहम्मद सैफुल इस्लाम, सोहेल खान, मोहम्मद सुमन हवालदार उर्फ बाबू या चार बांगलादेशी नागरिकासह कळंगुट येथे राहणारा महमूद याकूब याचा समावेश आहे.

अनिरुद्ध जयप्रकाश डेम्पो यांनी तक्रारी दिली होती. त्यानुसार, २० एप्रिल २०२५ रोजी नागाळी हिल येथील त्यांच्या वडिलांच्या बंगल्यात ४ ते ५ दरोडेखोरांनी बेकायदेशीर प्रवेश केला. दरोडेखोरांनी केअरटेकरसह डेम्पो यांच्या वृद्ध पालकांना मारहाण केली आणि त्यांचे हात-पाय बांधून त्यांना बाथरुम व बेडरूममध्ये डांबून ठेवले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. ​दरोडेखोरांनी घरातील सुमारे १ किलो सोन्याचे दागिने आणि ३ लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याचे म्हटले होते. या प्रकरणी प्रथम पणजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतर हे प्रकरण गुन्हा शाखेकडे वर्ग केले. याच दरम्यान ७ ऑक्टोबर २०२५ रोजी म्हापसा हाऊसिंग बोर्ड परिसरात ३५ लाखांचा ऐवज लुटून तक्रारदाराची कार घेऊन ते पसार झाले होते. या घटनेनंतर गोवा पोलीस टोळीच्या मागावर होते. दरम्यान, १४ आणि १५ एप्रिल २०२६ रोजीच्या मध्यरात्री दिल्लीतील सराय काले खान स्मशानभूमीजवळील जंगलात सदर टोळी एका नवीन दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या परिसराला वेढा घालून सहा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. दिल्ली पोलिसांनी बांगलादेश येथील मोहम्मद नाझीर, नूर इस्लाम ऊर्फ नदिम खान, मोहम्मद सैफुल इस्लाम, सोहेल खान, जाकिर हवालदार आणि मोहम्मद सुमन हवालदार ऊर्फ बाबू या सहा जणांना अटक करून गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेकडे सुपूर्द केले.

आरोपपत्रात ३० जणांची साक्ष

तपास पोलीस निरीक्षक दत्तगुरु सावंत यांनी केला. दरोडेखोरांनी चोरी केलेली सोन्याची नाणी आणि गुन्ह्यात वापरलेले लोखंडी रॉड, चाकू व इतर वस्तू हस्तगत केल्या. तपास पूर्ण करून चार बांगलादेशी नागरिकांसह कळंगुट येथे राहणारा महमूद याकूब याच्या विरोधात मेरशी येथील प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात सुमारे ३०० हून जास्त पानांचा समावेश असून ३० जणांची साक्ष नमूद आहे. 

हेही वाचा
सर्व पहा