थायलंडमध्ये स्वस्त ट्रिपचे आमिष दाखवून ३ भारतीय पर्यटकांचे अपहरण

व्हिडीओ कॉलवर छळाचे दृश्य दाखवून कुटुंबीयांकडे ४०-४० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी

Story: वेब डेस्क | गोवन वार्ता |
1 hours ago
थायलंडमध्ये स्वस्त ट्रिपचे आमिष दाखवून ३ भारतीय पर्यटकांचे अपहरण

थायलंडला गेलेल्या भारतीय पर्यटकांवर पट्टाया येथे ओढावलेला भीषण प्रसंग उघडकीस आला आहे. अतिशय स्वस्त टूर पॅकेजच्या आमिषाला बळी पडलेल्या तीन भारतीय तरुणांचे अपहरण करून त्यांना एका बंद खोलीत साखळदंडांनी बांधून त्यांचा अमानुष छळ करण्यात आला. थाई पोलिसांनी तत्परतेने धाड टाकून या तिन्ही तरुणांची सुखरूप सुटका केली असून, या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या पाच भारतीय संशयितांना अटक केली.

मोहित, आशिष आणि हिमांशु हे तीन तरुण २१ जुलै रोजी बँकॉकच्या विमानतळावर उतरले. सात दिवसांच्या स्वस्त थायलंड सहलीसाठी त्यांनी प्रत्येकी दोन लाख रुपये भरले होते. विमानतळावरून पट्टाया येथे पोहोचल्यानंतर एका फास्ट-फूड हॉटेलजवळ त्यांना गाठण्यात आले आणि भाड्याच्या दुमजली घरात नेण्यात आले. तिथे आधीपासूनच दबा धरून बसलेल्या अपहरणकर्त्यांनी या तिघांना ओलीस ठेवले. बँग लामंग जिल्ह्यातील एका घरात या तरुणांचे हात-पाय साखळदंडाने बांधून, त्यांना उलटे टांगून रोज अमानुष मारहाण केली जात होती.

संशयितांनी पीडितांच्या कुटुंबीयांना व्हिडीओ कॉल करून तरुणांच्या छळाचे दृश्य दाखवले आणि प्रति कुटुंब ४० लाख रुपये अशा सुमारे एक कोटी वीस लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. घाबरलेल्या कुटुंबीयांनी तत्काळ भारतीय दूतावासाशी संपर्क साधल्यानंतर थाई पोलिसांना सतर्क करण्यात आले. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या घरावर धाड टाकली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तिघे तरुण गंभीर जखमी अवस्थेत आढळले.

या प्रकरणात अवतार सिंग, जगजीत सिंग, रामबालक कुमार, सुखबीर सिंग आणि कुलराज सिंग या पाच भारतीय संशयितांना बँकॉकच्या एका हॉटेलमधून देश सोडून पळण्याच्या तयारीत असताना अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात या गुन्ह्याचे धागेदोर थेट पाकिस्तान आणि दुबईशी जोडलेले असल्याचे निष्पन्न झाले आहे. एका पाकिस्तानी व्यक्तीने मेसेजिंग ॲपद्वारे या अपहाराचे नियोजन केले होते, तर मुख्य सूत्रधार दुबईतून क्रिप्टोकरन्सीद्वारे खंडणी उकळण्याचे नेटवर्क चालवत होता. यापूर्वीही एका भारतीयाला अशाच प्रकारे डांबून ३० लाख रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा
सर्व पहा